Join us

हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:11 IST

Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत.

हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत.

पाण्याची मुबलकता असल्यामुळेच दरवर्षीच हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. हळदीची लागवड राज्यात सांगलीनंतर हळदीसाठी चांगली बाजारपेठ म्हणून वसमतकडे पाहिले जाते.

मार्चपासून हळद काढणी सुरू झाली असून एप्रिल अखेरपर्यंत हळद काढणी पूर्ण होईल, असे शेतकरी सांगत आहेत. हळदीनंतर कोचा निघत असून या कोचाला सद्यःस्थितीत चांगला भाव मिळत आहे.

त्यामुळे हळदीवर झालेला खर्च सहजपणे निघून जाईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हळद काढणीसाठी एकरी १३ ते १५ हजारांचा खर्च येतो आहे. एकरी कोचा ७० किलो ते १ क्विंटल निघत असून त्यातून शेतकऱ्यांस हातभार लागत आहे. 

सध्या कोचास हळदीपेक्षा दीडपट भाव मिळत आहे. हळद १३ हजार ते १६ हजारांपर्यंत जात आहे. तर कोचास प्रति क्विंटल २४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळू लागला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दर्जेदार कोचाला अधिक दर

कोचा कांडी व मंडा यास वेगवेगळे दर असतात. कोचा औषधी निर्मितीसाठी वापरला जात आहे. राज्यासह परराज्यात कोचाला मागणी आहे. सध्या कोचास प्रतिकिलो २४५ रुपयांचा भाव दिला जात आहे. - सय्यद इम्रान सय्यद वहीद, व्यापारी.

कुरुंदा येथे कोचा खरेदी सुरू आहे. महिना ते दीड महिना कोचा विक्रीस येतो. कोचाची आवक सध्या वाढली असताना देखील भावात तेजी आहे. - इम्रान शेख नूर, व्यापारी, वसमत जि. हिंगोली.

यंदा चार एकर हळद लागवड केली होती. हळद काढणीनंतर तीन क्विंटलच्या जवळपास कोचा निघाला. हळद काढणीस एकरी १५ हजार खर्च येतो. कोचामुळे हळद काढणीस हातभार लागला आहे. - विलास गलांडे, शेतकरी.

वसमत तालुक्यात निर्माण झाले खरेदी केंद्र

वसमत शहरातील काही व्यापारी कोचाची खरेदी करत आहेत. कवठा मार्गावर दोन तर कुरुंदा येथेही दोन केंद्र सद्यः स्थितीत कार्यरत आहेत. काळजीपूर्वक वेचणी केली तर एकरी १ क्विंटलच्या जवळपास कोचा निघतो. सध्या कोचास मिळणारा भाव समाधानकारक आहे. - अशोक दळवी, शेतकरी.

हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीपीकहिंगोलीमराठवाडाविदर्भशेती क्षेत्र