खामगाव : फेब्रुवारीतच बाजारपेठेतआंबा दाखल झाला आहे. सद्यः स्थितीत केरळमधून खामगावात आंब्याची (Kerala Mango) आवक (Arrivals) सुरू असून, सरासरी दर २०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
सामान्यतः एप्रिल ते जून हा आंब्यांचा हंगाम (Mango Season) मानला जातो; मात्र यंदा केरळ येथील आंबे बाजारात लवकर दाखल झाले आहेत. विशेषतः बदाम, गुलाब खश जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, सध्या पुरवठा मर्यादित असल्याने दर जास्त आहेत. हळूहळू आवक वाढेल, तशी दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. लवकर आलेल्या आंब्यांची मागणी मोठी असल्याने ग्राहकही त्यासाठी उत्सुक आहेत. सध्या २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारपेठेत विक्री सुरु आहे.
...तेव्हा हंगामाला सुरुवात
बंगळुरू येथून आंब्याचा माल आल्यानंतर हंगामाला सुरुवात होणार आहे, तसेच मुंबई व कोकण या भागातून आंबा दाखल व्हायला, अजून काही दिवस उशीर आहे. आगामी काही दिवसात आणखी काही प्रकारचे आंबे बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
१७० रुपये ठोक दर
आंब्याला १७० रुपये ठोक दर मिळत आहे, तर २०० रुपये दर आहेत. उन्हाळा जवळ येताच आंब्यांचा खरा हंगाम सुरू होईल आणि दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील.
अशी आहे आवक
खामगाव येथील फळ व्यापाऱ्यांकडे आठवड्यातून दोन दिवस आंब्यांची आवक असते. यामध्ये एका दिवसाला ५ क्विंटल आंबे ट्रकच्या माध्यमातून बाजारात येतात. सद्य स्थितीत केरळ येथून आवक सुरू आहे. पुढील आठवड्यात आणखी इतर ठिकाणावरून आंब्याची आवक होईल, असे व्यापाऱ्याने सांगितले.
आपल्या भागातील आंबा अजूनही बहारात आहे. वातावरणावर गावरान आंब्याची आवक अवलंबून असते. - नीलेश चिम, शेतकरी, राहुड
केरळ येथून आंब्याची आवक सुरू आहे. या आंब्यांचा किरकोळ दर २०० रुपये किलो आहे. सध्या आवक कमी आहे. - शेख इरफान, व्यापारी
हे ही वाचा सविस्तर : Gram, Turi Market: हरभरा, तुरीतून आशा की निराशा जाणून घ्या सविस्तर