Keli Market : ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार रुपयांवर पोहोचलेले केळीचे (Keli) दर डिसेंबर महिन्यात घटले असून सद्य:स्थितीत केळीला प्रतिक्विंटल १ हजार १०० ते १ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
वसमत तालुक्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पन्न घेतात. सद्य:स्थितीत केळीला प्रतिक्विंटल १ हजार ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे.
वसमत तालुक्यात केळीचे विक्रमी उत्पादन काढणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असले तरी वर्षाच्या शेवटी केळीचे दर घटले आहेत. ऑगस्ट महिन्यात २ हजार रुपयांपर्यंत केळीला दर मिळाला होता. जूनमध्ये केळी ८०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
सध्या केळीला १ हजार १०० ते १ हजार ४०० पर्यंत दर मिळू लागला आहे. भविष्यात केळीचे दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
वसमत, कुरुंदा, गिरगाव, सोमठाणा, पार्टी (बु.), किन्होळा, बोरगाव, नेहरूनगर आदी भागांतील शेतकऱ्यांकडे केळी बागा आहेत. दरवर्षीच तालुक्यात केळी उत्पादक केळीची लागवड करतात. वसमत तालुका केळी व हळद उत्पादनाबाबत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार रुपयांपर्यंत केळीला दर मिळाला.
त्यानंतर मात्र केळीचे दर वाढतील, अशी अशा शेतकऱ्यांना होती; परंतु ऑगस्ट महिन्यानंतर केळीचे दर घटतच गेले. घटत चाललेल्या दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
खर्चाच्या मानाने दर वाढवून मिळेना
पाच एकरांवर केळी बागेची लागवड केली असून केळी बाजारात पाठविली जात आहे. केळी लागवड खर्च जास्त प्रमाणात लागतो. त्या मानाने सध्या मिळत असलेले दर समाधानकारक नाहीत. केळीला दर वाढवून मिळाला तर शेतकऱ्यांना फायदा होईल. -अशोक गंगाधर दळवी, शेतकरी
केळीला मागणी घटली
ऑगस्ट महिन्यात केळीला प्रतिक्विंटल दोन हजारांचा दर मिळाला. त्यानंतर मागणीप्रमाणे दर मिळाले. सध्या १हजार २०० ते १ हजार ४०० प्रतिक्विंटल दर केळीला मिळत आहेत. भविष्यात दर वाढतील अशी आशा आहे. -असद शेख नूर, व्यापारी