Join us

Keli Bajar Bhav : पुणे-मुंबईचे व्यापारी केळी खरेदीला थेट बागेत कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:03 IST

नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे.

नासीर कबीरकरमाळा : नवरात्र उत्सवात उपवासासाठी केळीचा वापर वाढल्याने करमाळ्यातील केळीला बाजारातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. केळीचा भाव प्रति किलो २८ ते ३० रुपये किलो झाला आहे.

पुणे, मुंबई येथील व्यापारी खरेदीसाठी थेट केळीच्या बागेत येत आहेत. करमाळा तालुक्यात केळी पिकासाठी पोषक वातावरण असल्याने केळीच्या पिकाखालील क्षेत्रात वर्षांनुवर्षे वाढच होत आहे.

येथील केळीला गोडवा असल्याने निर्यातक्षम केळीचे उत्पादन येथे होते. तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे.टन केळीचे उत्पादन होत असून, तब्बल ८० हजार मे.टन केळी आखाती देशात निर्यात केली जात आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी धरण परिसरातील कंदर, वांगी, चिखलठाण, कुगाव, शेटफळ, केडगाव, वाशिंबे आदी बरोबरच पूर्व भागातील वरकटणे, सरपडोह, निंभोरे, सौंदे, गुळसडी, केम, साडे, घोटी या गावांच्या परिसरातील शेतकरी केळी पिकाकडे वळलेले आहेत.

दहिगाव उपसा सिंचन योजनेमुळे या परिसरात केळीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने करमाळा तालुक्यात वर्षभर केळीची लागवड केली जात असल्याने जळगाव जिल्ह्याबरोबरच या परिसरातून नियमितपणे केळीचा पुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर केळी व्यापारी या ठिकाणी केळी खरेदी करण्यासाठी येत आहेत.

उपवासासाठी केळीची मागणी वाढलेली आहे. गणेश उत्सवात केळीला प्रति किलो ३० ते ३२ रुपये भाव मिळालेला होता. गेल्या आठवड्यापासून जळगाव येथून केळीची आवक इकडे वाढल्याने केळीचे भाव दोन ते तीन रुपयांनी कमी झाले आहेत.

पुणे, मुंबई येथून केळीचे व्यापारी केळी खरेदीसाठी तालुक्यातील कंदर, वाशिंबे परिसरातील केळीच्या बागेत खरेदीसाठी आलेले आहेत. येथील केळीला २८ ते ३० रुपये किलोचा भाव देत आहेत.

करमाळा तालुक्यातील उत्पादित केळीला इराण, ओमान, दुबई यांसारख्या आखाती देशातून मोठी मागणी असल्याने दरवर्षी देशातून साधारण १६०० कंटेनर केळी निर्यात होते. यातील ४०० कंटेनर केळीचा पुरवठा एकट्या करमाळा तालुक्यातून मुंबई येथील जेएनपीटी बंदरावर केला जात असून तेथून केळी आखातात पाठवली जातात. - डॉ. विकास वीर, राजेरावरंभा शेतकरी प्रोडयूसर कं.

टॅग्स :केळीबाजारमार्केट यार्डपुणेमुंबईकरमाळानवरात्रीशारदीय नवरात्रोत्सव २०२४