नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत. नीरा कृषी उत्पन्न समितीमध्ये मंगळवारी (दि. १०) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी दत्त जयंतीचे औचित्य साधून हा कांदा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सभापती शरद जगताप यांनी माध्यमांना दिली आहे.
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या वर्षीपासून नीरा येथील मुख्य बाजारत कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता.
त्याच बरोबर सातारा जिल्ह्यातील नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांना जवळच बाजार उपलब्ध झाला होता. मध्यंतरीच्या काळात कांद्याची आवक बंद झाल्याने लिलाव थांबवण्यात आले होते.
आता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात कांदे काढणी चालू असून, या कांद्याला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्याला अनुसरून शनिवारपासून नीरा येथे मुख्य बाजारात कांदा निलाव सुरू करण्यात येणार आहेत.
याबाबत नीरा बाजार समितीमध्ये व्यापारी व संचालक मंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शनिवारपासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नीरा बाजार समितीचे सभापती शरद जगताप, संचालक अशोक निगडे, सुशांत कांबळे, बाळासाहेब जगदाळे, भाऊसाहेब गुलदगड, राजकुमार शहा, विक्रम दगडे, नितीन किकले, कृष्णांत खलाटे व व्यापारी उपस्थित होते.
आठवड्यातून एकदा होणार लिलावयावर्षी देखील दर शनिवार म्हणजेच आठवड्यातून एकदा कांद्याचा लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नीरा कृषी उत्पन्न समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणावा असा आवाहन नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शरद जगताप यांनी केले आहे, तर लिलावानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना पट्टी दिली जाईल, त्याच बरोबर सर्व व्यवहार पारदर्शकपणे केले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अधिक वाचा: Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर