Join us

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत काही दिवसांपूर्वी कांदा चार हजारांवर; आता कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:48 IST

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता २,२०० रुपयांच्या आत आले आहेत.

चाकण : मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली आहे. कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता २,२०० रुपयांच्या आत आले आहेत.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखली गेली नाही, तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निघणे अवघड होणार आहे. कांदा प्रत्येकाच्या घरात रोज लागणारा पदार्थ आहे.

कांदा कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना रडवतो. कांद्याला हा शेतकऱ्यांसाठी नगदी पीक समजले जाते. मात्र, दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांना कांदा रडवणार असल्याचे दिसत आहे.

कांदा हा सामान्यांना रोजच्या जेवणात लागणारा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे, परंतु कांद्याचे दर वधारले की मात्र, सामान्यांच्या डोळ्यात पाणी येते.

दुसरीकडे शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही तर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते. त्यात जुना कांदा, नवा कांदा अशा कांद्यांना वेगवेगळा दर मिळतो. कांदा जपावा लागत असल्याने खर्चही वाढतो.

२० टक्के घसरण का झाली?कांदा निर्यातीवरील केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. त्यामुळे निर्यातीसाठी व्यापारी वर्गाकडून अनास्था व नवीन कांदा बाजारात आल्याने आचक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कांदा दरात घसरण सुरू आहे.

चाकण येथील महात्मा जोतीराव फुले उपबाजारात बुधवारी (दि. १५) कांद्याचे तीन हजार पिशवी म्हणजे १,५०० क्विंटल आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त २,२०० रुपये बाजार भाव मिळाला. - बाळासाहेब धंद्रे, सचिव

नवीन कांद्याची आवक सुरू आहे. खेड तालुक्यासह जवळच्या जिल्ह्यातूनही कांदा चाकण बाजारात येत आहे. केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क कमी केल्यास दराची घसरण थांबेल. शेतकऱ्यांना फायदा होईल. - विजयसिंह शिंदे, सभापती

ज्यावेळी शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो. त्यावेळेस दरात घसरण सुरू होते, निर्यातमूल्य रद्द करावे ही शेतकऱ्यांची अनेक दिवसांची मागणी असूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. - मारुती पठारे, कांदा उत्पादक शेतकरी

नवीन कांद्याची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू असल्याने कांदा दरात घसरण सुरू आहे. पुढील काही दिवसांत अजून दर कमी होण्याची शक्यता आहे. - संभाजी कलवडे, आडते, चाकण बाजार

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीकचाकणशेतकरीशेतीकेंद्र सरकार