Join us

Kanda Bajar Bhav : नीरा बाजारात समितीत नंबर एक व गोल्टी कांद्याला कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:29 IST

सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे.

नीरा : मागील महिन्यामध्ये नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ३० ते ३२ रुपये किलोप्रमाणे विक्री होणारा कांदा आता ४ ते १५ रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे.

सरासरी पाहिले तर कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्याला चांगला दर मिळत होता. आता मात्र त्याच कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी यायला भाग पाडले आहे.

नीरा बाजारात शनिवारी झालेल्या लिलावामध्ये एक नंबर कांद्याला १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर गोल्टी कांद्याला ४०० रुपये दर मिळाला आहे.

कांद्याचा उत्पादन खर्च किलोला १७ रुपयांच्या पुढे आहे. त्यामुळे एक नंबरचा कांदा पंधरा रुपये किलोने विकला तरी शेतकऱ्याला दोन रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

सरासरी दर १० रुपये किलो बसत आहे. शेतकऱ्याला किलोला ७ ते ८ आठ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा ८०० रुपये कमी मिळत आहेत. या मिळालेल्या रकमेतून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च भागणेदेखील मुश्कील आहे. 

वाढलेले उत्पादनाचा दरावर परिणामयावर्षी हळव्या (पावसाळी) कांद्याचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. देशातील बाजारामध्ये कांद्याची आवक जास्त झाली. याचा परिणाम म्हणून कांद्याचे भाव कमी झाले आहेत. 

बैलगाडीतून कांदा वाहतूकशेतकरी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर ट्रॉली किंवा छोट्या वाहनातून कांदा बाजारत आणतात. वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने पिंपरे येथील शेतकऱ्याने बैलगाडीतून कांदा पिशव्या विक्रीसाठी आणल्या. 

सांगा आम्हाला हे परवडणार कसे?'१,३०० रुपये क्विंटलने कांदा विक्री परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलेय. खताची पिशवी ३,००० रुपयाला बसते. मजुरीला महिलांना २५० ते ३०० रुपये द्यावे लागतात मग सांगा आम्ही करायचे काय? आम्ही आत्महत्या करायची का? सरकार आम्हाला अनुदान देतो म्हणते, हमीभाव देतो म्हणते, पण आमच्या वाट्याला काहीच येत नाही.' अशी खंत कांदा उत्पादक लक्ष्मण वाघापुरे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :कांदाशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजारमार्केट यार्ड