Join us

Kanda Bajar Bhav : राहुरी बाजार समितीत १८ हजार गोण्याची आवक; नंबर १ कांद्याला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:39 IST

मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.

आकाश येवलेराहुरीः मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.

वातावरणातील बदलामुळे चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. दिवसागणिक चाळी बसत आहेत. दुसऱ्या बाजूला आवक वाढत असल्याने भाव वाढेनात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

राहुरी बाजार समितीत आज रविवारी (दि. २०) १८ हजार १५ गोण्यांची आवक झाली. लिलावात १०० ते १७०० रुपये दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीचा सामना करत असताना सरकार या प्रश्नात लक्ष घालताना दिसत नाही. बँका, सोसायटी व पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज फेडणे मुश्कील झाले आहे. खराब कांदा डोळ्यादेखत उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ सरकारी धोरणामुळे आली आहे.

राहुरीतील रविवारचे भावनंबर एक - १३०५ ते १६००नंबर दोन - ७०५ ते १३००नंबर तीन - १०० ते ७००गोल्टी - २०० ते १२००

शेतकऱ्यांचा कांदा डोळ्यादेखत उकिरड्यावर!कांद्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी अक्षरशः हताश झाले आहेत. चाळीत साठवलेला कांदा दर मिळत नसल्याने खराब होत आहे. दर इतके घसरलेत की अनेकांना डोळ्यांदेखत कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

कांदा उत्पादनासाठी एकरी ८० ते ९० हजारांच्या आसपास खर्च आला. त्या तुलनेत भाव अत्यंत कमी आहे. दुसऱ्या बाजूला चाळीत कांदा सडण्याचे प्रमाण जवळपास ३० ते ३५ टक्के आहे. - भानुदास तोडमल, कांदा उत्पादक

कांद्याचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्याकडे कांदा स्टॉक आहे. या राज्यात कांदा पाठवण्यास परवडत नाही. दक्षिण भारतात नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. निर्यातीच्या अस्थिर धोरणामुळे जी निर्यात व्हायला पाहिजे ती अवघी ३० ते ४० टक्के आहे. बांगलादेशची निर्यात बंद आहे. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. - सुभाष सावज, अध्यक्ष कांदा व्यापारी

कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. खर्च फिटणे देखील मुश्कील झाले आहे. नाफेडमार्फत सरकारने कांदा खरेदी करावा. त्या कांद्याला अडीच हजार रुपये दर व किलोला पंधरा रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. - रवींद्र मोरे, जिल्हा अध्यक्ष (उत्तर) स्वाभिमानी शेतकरी संघटना

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीराहुरीबांगलादेशशेतकरीशेतीगुजरात