Jalna Dagdi Jwari : जालना जिल्ह्यातील पारंपरिक दगडी ज्वारी (Dagadi Jawari) आता केवळ शेतात नाही, तर बाजारातही आपली खास ओळख निर्माण करत आहे.
गेल्या वर्षी मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे (GI Tag) या ज्वारीला ब्रँडसारखी ओळख मिळाली असून, यंदा शेतकऱ्यांनी १०० एकरावर लागवड केली अन् यंदा बाजारात सोन्याचा दर मिळताना दिसत आहे.
जालना जिल्ह्यातील पारंपरिक दगडी ज्वारी (Dagadi Jawari) आता केवळ शेतात नाही, तर बाजारातही आपली खास ओळख निर्माण करत आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या भौगोलिक मानांकनामुळे (GI Tag) या ज्वारीला ब्रँडसारखी ओळख मिळाली असून, यंदा शेतकऱ्यांनी १०० एकरावर लागवड केली.
कमी पाण्यात चांगले उत्पादन देणाऱ्या या ज्वारीने शेतकऱ्यांच्या पदरात प्रतिक्विंटल ४ हजाराचा दर मिळाला आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा ठरत आहे, जिथे पारंपरिक शेतीही आधुनिक मार्केटमध्ये यशस्वी ठरू शकते, हे सिद्ध होत आहे.
जालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीला मिळालेल्या GI (Geographical Indication) मानांकनामुळे बाजारात चांगला दर मिळतो आहे. आता ही ज्वारी 'दगडी' नावाला साजेशी भाव खात आहे. गेल्या वर्षी GI मानांकन मिळाल्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली असून, यंदा तब्बल १०० एकरांवर दगडी ज्वारीची पेरणी करण्यात आली होती.
कमी पाण्यातही भरघोस उत्पादन
बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी, पाडळी, वरूडी आदी परिसरात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ही पेरणी केली होती. विशेष म्हणजे ही ज्वारी कमी पाण्यातही चांगले उत्पादन देते, ही तिची खासियत आहे. एकरी ९ ते १० क्विंटल उत्पन्न मिळाल्याचे शेतकरी सांगतात.
याचबरोबर या दगडी ज्वारीला ४ हजार प्रतिक्विंटलचा दर सध्या बाजारात मिळत असून, पारंपरिक ज्वारीच्या तुलनेत हा दर मोठ्या फरकाने अधिक आहे.
GI मानांकनामुळे 'ब्रँडिंग'
दगडी ज्वारीसाठी GI मानांकन मिळवण्यासाठी मात्रेवाडी येथील 'जय किसान शेतकरी गटाचे' भगवान मात्रे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पेटंट विभागाने २०२३ मध्ये या ज्वारीला अधिकृत GI मानांकन दिले.
याआधी जालना जिल्ह्यातील मोसंबीलाही GI मानांकन मिळाले असून, त्यानंतर तिची देश-विदेशात मागणी झपाट्याने वाढली होती. तशीच ओळख आणि बाजारपेठ दगडी ज्वारीलाही मिळण्याची शक्यता आहे.
दगडी ज्वारीचे वैशिष्ट्य काय?
* दगडासारखी घट्ट, टिकाऊ आणि चवदार ज्वारी
* कमी पाण्यात टिकणारे पीक
* शिजवायला वेळ लागतो पण चव आणि पोषणमूल्य जास्त
* पारंपरिक आहारात महत्त्वाचे स्थान
दगडी ज्वारीचा ब्रँड
दगडी ज्वारीच्या GI मानांकनामुळे आता शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, आणि निर्यात यामध्येही संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि शासकीय पाठबळ मिळाल्यास जालना जिल्हा 'दगडी ज्वारीचा ब्रँड' म्हणून उदयास येऊ शकतो.
शेतकऱ्यांचा अनुभव काय सांगतो?
या वर्षी तालुक्यात ६० रुपये प्रतिकिलो दराने बियाण्यांची विक्री करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा उत्पादनही चांगले आणि दरही उत्कृष्ट मिळाला. यामुळे या ज्वारीची लागवड पुढील वर्षी अधिक प्रमाणात होईल याची शक्यता आहे. - भगवान मात्रे, शेतकरी