हिंगोली : येथील बाजार समितीच्या (Market yard) मोंढ्यात दोन दिवसांपासून तुरीचे भाव दोनशे ते तीनशे रुपयांनी वधारले आहेत, तर हळदीच्या भावात घसरण झाली आहे. या शिवाय सोयाबीनची दरकोंडी कायम असल्याचे चित्र आहे.
यंदा नैसर्गिक संकटांमुळे सोयाबीन (Soybean) उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच भावही समाधानकारक मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आता शेतकऱ्यांकडे तूर (Tur) उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपासून तुरीच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी मागीलवर्षीच्या तुलनेत सध्याचा भाव कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर २०२४ मध्ये तुरीने १० ते ११ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. त्या तुलनेत सध्या अडीच ते तीन हजार रुपयांनी भाव कमी मिळत आहे.
२३ जानेवारी रोजी मोंढ्यात २५० क्विंटल तुरीची आवक झाली होती. किमान ७ हजार २५ ते कमाल ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. तर एक- दोन शेतकऱ्यांची तूर ८ हजाराने विक्री झाली, तर हळदीच्या (Turmeric) दरात क्विंटलमागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली असून, गुरुवारी सरासरी १२ हजार ५०० रुपयाने हळद विक्री झाली.
सोयाबीनची दरकोंडी कायम...
यंदा नैसर्गिक संकटांचा फटका सोयाबीन पिकाला सर्वाधिक बसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे किमान सहा हजाराचा भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, यंदा सरासरी चार हजारावर सोयाबीन गेले नाही. येणाऱ्या दिवसांतही भाववाढीची शक्यता कमीच असल्याचे व्यापारी सांगत असल्याने आता शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत आहेत.
हळदीची ८२० क्विंटल आवक
संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची सरासरी आवक मंदावली आहे. हंगामात चार ते पाच हजार क्विंटलवर आवक गेली होती. आता मात्र सरासरी ८०० ते एक हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. गुरुवारी(२३ जानेवारी) रोजी ८२० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. ११ हजार ५०० ते १३ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल...
शेतमाल | आवक (क्विं.) | सरासरी भाव |
गहू | ६५ | २,७४० |
ज्वारी | ३५ | १,९१० |
तूर | २५० | ७,२२५ |
सोयाबीन | ८०५ | ४,०७० |
हळद | ८२० | १२,५०२ |
हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement : सात दिवसांत सोयाबीन खरेदीचे आव्हान वाचा सविस्तर