हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाल्याने पुणेकरांची पावले देशी सफरचंदाच्या खरेदीकडे वळू लागली आहेत. मार्केटयार्ड फळ बाजारात देशी सफरचंद दाखल सुरू होतात. आता परदेशातून येणाऱ्या सफरचंदाचे दरही आवाक्यात येऊ लागले आहे.
घाऊक बाजारात देशी सफरचंदाच्या १२ ते १५ किलोच्या पेटीस १८०० ते ३६०० रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात सफरचंदाची १६० ते २०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजली जाणारी अन् देशासह परदेशातून शहरातील बाजारपेठेत दाखल होणारी सफरचंद लहानांपासून ज्येष्ठांच्या आवडीचे हे फळ आहे. सध्या हिमाचलच्या सफरचंदाची बाजारात आवक सुरू असून १८ ते २५ किलोच्या ४८८ बॉक्सची आवक झाली.
देशी सफरचंद स्वस्त
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात वॉश्गिंटन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होते. मात्र, भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसांनी थेट बाजारात येतात आणि त्यांचा वाहतूक खर्च या परदेशी सफरचंदाच्या मानाने कमी असल्याने बाजारात त्यांचे दरही कमी असतात.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहा दिवस अगोदर हंगाम सुरू झाला आहे. पहिल्याच दिवसापासून सफरचंदाला मागणी आहे. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदाचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू ही आवक आणखी वाढेल. त्यानंतर सफरचंदाचे दर आणखी खाली येतील. यंदा उत्पादनही चांगले असल्याचे चित्र आहे. - गोरक्षनाथ हजारे, सफरचंद व्यापारी.
हेही वाचा : फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळालेला सर्पमित्र नक्की कसा असावा? वाचा सविस्तर