Join us

पहिल्याच दिवशी लिलावात मिळाला उच्चांकी दर; नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:55 IST

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी ४५ रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास नीरा बाजार समितीत कांद्याची आवक वाढेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी ४५ रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास नीरा बाजार समितीत कांद्याची आवक वाढेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

हळवी कांदा साठवणूक करता येत नसल्याने तो आता बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्याचबरोबर आगाप लागवड केलेला गरवी कांदाही काढणीला आला आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा येणार आहे.

याची दखल घेत नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी तातडीने कांदा लिलाव सुरू केले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांदा लिलावाला सुरुवात झाली होती. दर शनिवारी हा कांदा लिलाव सुरू राहणार असल्याचे सभापती शरद जगताप यांनी सांगितले.

शनिवारी दुपारी चार वाजता ज्येष्ठ संचालक अशोक निगडे व बाळासाहेब जगदाळे यांच्या हस्ते वजनकाट्याची पूजा व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती शरद जगताप, संचालक देविदास कामठे, भाऊसाहेब गुलदगड, राजकुमार शहा, गणेश होले, बाळासाहेब शिंदे, सुशांत कांबळे, अनिल माने, विक्रम दगडे, पृथ्वीराज निगडे, व्यापारी मनसुखलाल शहा, बिपीन शहा, दिलीप परदेशी, नीलेश स्वामी, शुभम शहा यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात पहिल्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, हमाल, तोलारी यांचे स्वागत गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन करण्यात आले.

पुरंदर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी हे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. पुढील महिन्यापासून पहाटेच्या वेळी भाजीपाल्याचा बाजार सुरू करत आहोत. तसेच भुसार बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत आता नव्याने धान्य खरेदी-विक्री केली जाणार आहे. मार्च महिन्यात धान्य बाजार सुरू करून, नीरा बाजार समितीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करु. - शरद जगताप, सभापती नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती.

हेही वाचा : शाळेतील शेतकऱ्यांची मुलं म्हणताहेत 'आमची भाजी आम्ही पिकवू'

टॅग्स :बाजारकांदाशेतकरीशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्र