हिंगोली : येथील बाजार समितीच्या मोंढ्यात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. मंगळवारी (४ फेब्रुवारी) रोजी २४० क्विंटल आवक झाली होती. सरासरी ५ हजार ५५० रुपये भाव मिळाला.
पूर्वी रब्बीत शेतकऱ्यांचा भर गहू (wheat) पेरणीवर असायचा. मागील दोन वर्षापासून मात्र गव्हापेक्षा हरभऱ्याचा पेरा अधिक होत आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना हरभऱ्याने (Chick pea) साथही दिली.
यंदाही हरभऱ्याचे क्षेत्र वाढले असून, काही भागात हरभरा काढणीचे कामही आटोपले आहे. तर काही भागात सुरू आहे. सध्या आवक कमी असल्यामुळे भाव बऱ्यापैकी आहेत.
आवक वाढल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हरभरा काढणी करताच विक्रीसाठी आणत आहेत. सध्या सरासरी २०० ते २५० क्विंटलची आवक होत आहे. तर भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांदरम्यान मिळत आहे.
तूर तीनशे रुपयांनी घसरली...
* गेल्या आठवड्यात सरासरी ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळालेली तूर (Tur) मंगळवारी (४ फेब्रुवारी) रोजी ६ हजार ८०० रुपये क्विंटलने विक्री झाली. तर, आवक ६०० क्विंटलची झाली होती.
* मागीलवर्षी तुरीने ११ हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. भाव कायम राहतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, भाव पडल्याने निराशा झाली आहे. दरम्यान, येणाऱ्या पंधरवड्यात तरी भाव पडतेच राहण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.
सोयाबीनला ३ हजार ९०० रुपयांचा भाव
* हिंगोलीच्या मोंढ्यात मागील वर्षभरापासून सोयाबीनची (Soybean) दरकोंडी कायम आहे. सध्या सरासरी ३ हजार ९०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
* यातून लागवड खर्च ही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा एलोमोझॅकमुळे उत्पादनात घट झाली.
* त्यातच पडत्या भावात सोयाबीनची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.