हिंगोली : शेतकऱ्यांकडे नवा हरभरा (Harbhara) उपलब्ध झाला असून, बाजार समितीच्या (APMC) मोंढ्यात दिवसेंदिवस आवक वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याची बीट सुट्टीचे दिवस वगळून दररोज करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वी रब्बी हंगामात (Rabi Season) इतर पिकांपेक्षा गव्हाचा (Wheat) पेरा सर्वाधिक होत होता; परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांची पसंती हरभऱ्याला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याचे उत्पादन वाढले आहे.
आठवडाभरापासून हरभरा काढणीला प्रारंभ झाला असून, अनेक शेतकऱ्यांकडे नवा हरभरा उपलब्ध झाला आहे. येथील बाजार समितीच्या मोंढ्यात आवक वाढली आहे. त्यामुळे एक किंवा दोन दिवसांआड हरभऱ्याची बीट झाल्यास आवक वाढत आहे. त्यामुळे मोजमापाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेता मोंढ्यात दररोज लिलाव करण्यात येणार आहे. यामुळे सुट्टीचे दिवस वगळून शेतकऱ्यांना मोंढ्यात हरभरा विक्रीसाठी आणता येणार आहे.
शेड क्रमांक २ मध्ये राहणार हरभरा...
मोंढ्यातील शेड क्रमांक २ मध्ये दररोज हरभऱ्याचा लिलाव होणार आहे. शिवाय याच शेडमध्ये मोजमापही होणार असल्याने शेतकरी, हमाल आणि मापारी यांच्याकरिता सोयीचे ठरणार आहे. हरभऱ्याची आवक वाढत असल्याने बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे.
सरासरी ५३९० रुपयांचा मिळतोय भाव
हिंगोलीच्या मोंढ्यात सध्या हरभऱ्याची आवक वाढली असून, दररोज सरासरी ८०० ते ८५० क्विंटल हरभरा विक्रीसाठी येत आहे. १७ फेब्रुवारी रोजी ८५० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार १४० ते ५ हजार ६४५ प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. येणाऱ्या दिवसात हरभरा वधारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आठवड्यातील तीन दिवस तूर आणि सोयाबीनचा लिलाव
* हिंगोलीच्या मोंढ्यातील शेड क्रमांक १ मध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस सोयाबीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहेत, तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी तुरीचा लिलाव करण्यात येणार आहे.
* मागील काही दिवसांपासून सोयाबीन आणि तुरीची आवक मंदावली आहे. त्यामुळे बाजार समितीने आठवड्यात तीन-तीन दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.