Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Market पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपतोय; दुसऱ्या टप्पा २० मेपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 12:01 IST

पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपत आला असून, दि. १० मेपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूसचा हंगाम दि. २० मेपासून सुरू होणार आहे. हा आंबा दि. १० जूनपर्यंत बाजारात असेल.

रत्नागिरी : पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा संपत आला असून, दि. १० मेपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील हापूसचा हंगाम दि. २० मेपासून सुरू होणार आहे. हा आंबा दि. १० जूनपर्यंत बाजारात असेल.

मात्र, या कालावधीत पावसाने हजेरी लावल्यास आंबा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे भवितव्य पावसावर अवलंबून आहे. सध्या बाजारात १,००० ते २,२०० रुपये पेटीला दर मिळत आहे.

जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेला आंबा हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. अजून महिनाभर हा हंगाम राहणार आहे. जिल्ह्यातील बागायतदार कच्चा आंबा वाशी बाजारपेठेसह सांगली, पुणे, राजकोट, अहमदाबाद येथे विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे.

कोल्हापूर बाजारपेठेत मात्र पिकलेल्या हापूसची विक्री होते. हापूस पिकवून विक्रीला पाठवताना शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे कच्चाच आंबा विक्रीला पाठविणे सुलभ ठरत आहे. उर्वरित आंबा किलोवर घातला जातो.

सध्या कॅनिंगचा दर ३० रुपये किलो इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंबा हंगाम चांगला राहिला आहे. मात्र, दराअभावी बागायतदारांचे नुकसान होत आहे. गतवर्षी याचवेळी पेटीला १,५०० ते ३,२०० रुपये दर मिळत होता.

यावर्षी हाच दर १,००० ते २,२०० रुपये इतका आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल व त्याचा पिकावर होणारा परिणाम यामुळे आंबा पीक वाचविण्यासाठी बागायदारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या तुलनेत आंब्याला मिळालेला दर कमी असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या बाजारात पेटीला दर (रुपये) १,००० ते २,२००कॅनिंगचा दर ३०/- किलो

कीडरोग, थ्रीप्स, तुडतुड्यांपासून आंबा पीक वाचविण्यात यश आले असले तरी त्यासाठी खर्चही मोठ्या प्रमाणावर करावा लागला. खर्चाच्या पटीत दर न लाभल्याने पुन्हा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. यावर्षी आंबा चांगला झाला, परंतु अपेक्षित दर मात्र मिळालेला नाही. - राजन कदम, बागायतदार

अधिक वाचा: मध्यस्थांची साखळी तुटल्याने थेट ग्राहकाच्या दारी येणार आंबा, शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डरत्नागिरीशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती