Join us

Hapus Mango Bajar Bhav : वाशी मार्केटमध्ये देवगड हापूसच्या १०० पेट्या दाखल; पेटीला कसा मिळाला दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:34 IST

कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी उष्मा अशा नैसर्गिक संकटांवर मात करत झाडांना आलेला मोहर वाचवून तयार झालेला हापूस आता मुंबईच्या बाजारात दाखल झाला आहे.

नवी मुंबई/रत्नागिरी : कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी उष्मा अशा नैसर्गिक संकटांवर मात करत झाडांना आलेला मोहर वाचवून तयार झालेला हापूस आता मुंबईच्या बाजारात दाखल झाला आहे.

वाशी मार्केटमध्ये मंगळवारी कोकणातून हापूसच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत ३२५ आंबा पेट्या आल्या असून, यातील ९५ टक्के देवगडमधील, तर पाच टक्के रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

वाशी मार्केटमध्ये १ फेब्रुवारी रोजी १७५ आंबा पेट्या विक्रीला आल्या होत्या. रविवारी मार्केटला सुट्टी असल्याने विक्रीसाठी आंबा आला नाही. त्यानंतर, सोमवारी ५० पेट्या, मंगळवारी १०० पेट्या विक्रीसाठी आल्या.

सध्या आंबा पेटीला ७ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आंबा झाडांना मोहर आला. मात्र, मोहराला निव्वळ फुलोरा राहिला आणि फळधारणाच झाली नाही.

मोहर काळा पडलाथंडी, उष्मा, ढगाळ हवामान एकूणच संमिश्र हवामानामुळे तुडतुडा, थ्रीप्स, कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यातच अनेक ठिकाणी मोहर काळा पडला. काही मोहराच्या टोकाला एखाद दुसरे फळ होते. मात्र, तेही थंडीमुळे गळून गेले आहे.

अथक प्रयत्नानंतर बचावलेला आंबा तयारऑक्टोबरमध्ये आलेला मोहर व लगडलेली फळे वाचविण्यासाठी बागायतदारांना झाडावर ताडपत्रीही बांधावी लागली. बागायतदारांच्या अथक प्रयत्नानंतर बचावलेला आंबा आता तयार झाल्याने विक्रेत्यांनी फळ काढणी सुरू केली आहे. मात्र, हे प्रमाण किरकोळच असून, तयार झालेला आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे.

वाशी मार्केटमध्ये दि. १ फेब्रुवारीपासून हापूस विक्रीसाठी येऊ लागला आहे. जानेवारीत एखाद दुसरीच पेटी आली होती. गेल्या तीन दिवसांत मार्केटमध्ये ३२५ पेट्या आल्या असल्या, तरी ९५ टक्के आंबा देवगड (सिंधुदुर्ग) तर अवघा ५ टक्के आंबा रत्नागिरीचा आहे. - संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी

टॅग्स :आंबापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीरत्नागिरीपाऊसनवी मुंबईमुंबईबाजारमार्केट यार्ड