हिंगोली :
मराठवाड्यासह विदर्भात खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील हळद मार्केट यार्डात(Halad Market) आठवडाभरापासून वधारलेल्या हळदीच्या भावात ८ एप्रिलपासून पुन्हा घसरण झाली. भावात झालेली ही घसरण शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाची चिंता वाढविणारी ठरत आहे.
सध्या हळदीचा हंगाम सुरू असून, हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची(Halad Market) विक्रमी आवक होत आहे. चार दिवसांपूर्वी तर तब्बल १० हजार क्विंटलवर आवक झाली होती. मागील आठवड्यात १६ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव पोहोचला होता.
दैनंदिन चार ते पाच हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत असल्याने मार्केट यार्डासह बाहेरील रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागत आहेत. शिवाय मोजमापासाठीही एक ते दोन दिवस लागत आहेत.(Halad Market)
८ एप्रिलपूर्वी चार ते पाच दिवस हळदीच्या भावात वाढ झाली होती. त्यामुळे हिंगोली, परभणी, नांदेडसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती.(Halad Market)
दर्जेदार हळदीची १५ ते १६ हजार रुपये क्विंटलने खरेदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत होते. हा भाव कायम राहण्याची अपेक्षा असताना मंगळवारी क्विंटलमागे जवळपास ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली. भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
बाजारपेठेतील आवक वाढलेली असतानाच अचानक हळदीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हळदीचे भाव पूर्वपदावर येण्याची आशा
जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण हळद उत्पादकांसाठी नुकसानदायी ठरत आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी दर्जेदार हळदीला १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असताना अचानक भाव उतरले.
याचा परिणाम मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीवर झाला आहे. त्यामुळे शेतकरी, खरेदीदारांची चिंता वाढली असून, हळदीचे भाव पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा केली जात आहे.
उत्पादक शेतकऱ्यांत नाराजीचा सूर
क्विंटलमागे अचानक पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाल्यामुळे ८ एप्रिल रोजी मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून काहीवेळ गोंधळही उडाला होता; परंतु, जागतिक मंदीचा हा फटका बसल्याचे जाणकार सांगत असले तरी शेतकऱ्यांत मात्र नाराजीचा सूर उमटत आहे.
हळदीच्या भावातील चढ-उतार
दिनांक | किमान भाव | कमाल भाव | सरासरी भाव |
०३ मार्च | १३,००० | १६,००० | १४,५०० |
०४ मार्च | १२,५५० | १५,०५० | १३,८०० |
०५ मार्च | १२,००० | १५,००० | १३,५०० |
०७ मार्च | ११,६०० | १४,१०० | १२,८५० |
०८ मार्च | ११,५०० | १४,००० | १२,७५० |
०९ मार्च | १२,००० | १४,२५० | १३,१२५ |