Halad Market : यंदा उच्चांकी दर मिळालेल्या हळदीच्या(Halad) दरात जुलैपासून घसरण झाली. परंतु, गेल्या चार दिवसांत २०० रुपयांनी भाव वधारला असून, गुरुवारी (९ जानेवारी) रोजी सरासरी १३ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला. तर तुरीच्या दरात मात्र घसरण कायम असून, उत्पादक शेतकऱ्यांना(farmer) भाववाढीची प्रतीक्षा आहे.
हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात(Market Yard) हळदीला एप्रिल, मे २०२४ मध्ये सरासरी १५ ते १६ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. परंतु, खरिपाची पेरणी लागताच जून-जुलैमध्ये दरात घसरण(Fall in price) होण्यास सुरुवात झाली.
ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान शेतकऱ्यांना सरासरी १२ ते १३ हजार रुपये क्विंटलने विक्री करावी लागली. क्विंटलमागे २ ते ३ हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मात्र हळदीच्या दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली असून, १२ हजार ५०० ते १४ हजार ८०० रुपयांदरम्यान दर मिळत आहे, तर सरासरी १३ हजार ६०० रुपयांचा दर मिळत असल्याने हळद उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मात्र यंदा निराशा येत आहे. गेल्यावर्षी ११ ते १२ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेली तूर सध्या ७ हजार २०० रुपये क्विंटलने विक्री करावी लागत आहे. क्विंटलमागे चार ते साडेचार हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२४ पर्यंत तुरीचे भाव दहा हजारांवर होते.
परंतु, शेतकऱ्यांकडे नवी तूर उपलब्ध होताच भावात घसरण झाली. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असून, तुरीचा दर वधारण्याची प्रतीक्षा केली जात आहे. शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येताच भावात घसरण होत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे.
हळदीची आवक वाढली
* हळदीच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाल्याने गुरुवारी आवक वाढली होती.
* दररोज सरासरी ८०० ते ९०० क्विंटल हळद विक्रीसाठी येत असताना गुरुवारी; मात्र एक हजार १०० क्विंटलची आवक झाली होती.
* भाव वधारल्यामुळे आवक वाढल्याचे आडत व्यापाऱ्याने सांगितले.
मोंढ्यात शेतमालाची आवक
शेतमाल | आवक (क्विं. मध्ये) | सरासरी भाव |
तूर | ६३ | ७,२२५ |
सोयाबीन | ९०० | ४,०५० |
हरभरा | ०५ | ५,२५० |
हळद | ११०० | १३,५९५ |
हे ही वाचा सविस्तर: Market yard : शासनाचा शेतमालाला 'हमीभाव'; पण बाजारात 'कमीभाव' वाचा सविस्तर