Halad Market : वाशिम जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. या वाढत्या उष्णतेचा परिणाम वाशिमसह इतर बाजार समित्यांमधील शेतमालाच्या आवकेवरही दिसून येत आहे. (Halad Market)
मात्र, वाशिम बाजार समितीत शुक्रवारी (३ मे) रोजी हळदीला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हातही बाजार समितीकडे गर्दी केली. परिणामी, तब्बल १४ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक नोंदवली गेली. (Halad arrival)
मागील काही आठवड्यांपासून शेतकरी वाढत्या तापमानामुळे शेतमाल विक्रीस टाळाटाळ करत आहेत. कारण, बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलावानंतर मोजणीसाठी ताटकळावे लागते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
त्यामुळे अनेक शेतकरी केवळ अत्यावश्यकतेनुसारच शेतमालाची विक्री करीत आहेत. परिणामी बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. (APMC)
तथापि, वाशिमच्या बाजार समितीत हळदीला समाधानकारक दर मिळत आहे. विशेषतः काळ्या हळदीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला, त्यामुळेच शुक्रवारी हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
वाशिमच्या बाजारात सध्या ३ प्रकारच्या हळदीची खरेदी होताना दिसत आहे. बाजारात हळदीला सरासरी भाव १३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला .
एक दिवसाच्या खरेदीचाही परिणाम
* वाशिम येथील बाजार समिती अंतर्गत हळदीची खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा आठवड्यातील एकच दिवस निश्चित करण्यात आला आहे.
* इतर दिवशी हळदीची खरेदी होत नाही. त्यातच या शेतमालास समाधानकारक दर मिळत आहेत.
* त्यामुळेच शुक्रवारी या बाजार समितीत हळदीची आवक वाढली होती.
इतर शेतमालाची आवक मात्र कमी
वाशिमच्या बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याचे दिसत असले तरी इतर शेतमालाची आवक मात्र मंदावल्याचे दिसत आहे. सोयाबीनसह, तूर, हरभरा या शेतमालाचीही आवक मोठ्या प्रमाणात घसरल्याचे मागील आठवडाभरातील आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे.