ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि परिसरातील शेतकरी सध्या कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झालेली असताना, कित्येक महिन्यांपासून चाळीत साठवलेल्या कांद्याला बाजारात केवळ २ ते १२ रुपये प्रतिकिलो इतकाच भाव मिळत आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असून, शासनाने कांद्यासाठी हमीभाव आणि निर्यात अनुदान जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुन्नर तालुक्यात सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते. गेल्या वर्षी (२०२४) कांद्याला सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला होता. मात्र, यंदा हा भाव २ ते १२ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला आहे.
मशागत, बियाणे, खत, पाणी, फवारणी आणि मजुरी यांचा विचार करता, प्रतिएकरी ८० हजार ते १ लाख रुपये खर्च येतो; परंतु कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांना प्रतिएकरी ४० हजार रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे.
याबाबत शेतकरी उत्तम गाढवे, दिलीप शेटे, समीर घोलप, प्रतिम डुंबरे, तेजस घोलप आणि अंकुश घोलप यांनी आपली खंत व्यक्त केली.
शासनाकडे मागणी◼️ शेतकऱ्यांनी कांद्यासाठी कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांप्रमाणे आधार मिळावा, अशी मागणी केली आहे. शासनाने तातडीने हमीभाव जाहीर करून आणि निर्यात अनुदान देऊन शेतकऱ्यांचे संरक्षण करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.◼️ बाजारभाव नसल्याने आमच्या कष्टाचे फळ नाहीसे झाले आहे. शासनाने आमच्यासाठी उभे राहावे, अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, असे शेतकरी पंकज घोलप यांनी ठणकावून सांगितले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम◼️ कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून, त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे.◼️ फक्त आर्थिक मदत नाही, तर भविष्यासाठी स्थिर आणि स्पष्ट धोरण हवे आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.◼️ कमी बाजारभावामुळे शेती करणे जोखमीचे बनले असून, अनेक शेतकरी शेती सोडून दुसऱ्या कामाच्या शोधात भटकण्याची शक्यता आहे.
निर्यात अनुदान द्या◼️ कमी बाजारभावामुळे शेती करणे जोखमीचे बनले असून, अनेक शेतकरी शेती सोडून दुसऱ्या कामाच्या शोधात भटकण्याची शक्यता आहे.◼️ शेतकऱ्यांना कांद्यासाठी कापूस आणि सोयाबीनप्रमाणे हमीभाव जाहीर करावा आणि निर्यात प्रोत्साहनासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.
कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही. बाजारभाव इतका कमी असल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने प्रतिकिलो १५ रुपये अनुदान आणि हमीभाव जाहीर करावा. शेतीसाठी घेतलेले कर्ज वाढत आहे; पण उत्पादनाला भाव मिळत नाही. यामुळे मानसिक तणाव वाढतो आहे. हमीभाव आणि अनुदानाशिवाय शेती टिकणार नाही. - पंकज घोलप, शेतकरी
अधिक वाचा: ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?