धाराशिव : एकीकडे हमीभाव खरेदी केंद्रावर रांग लावूनही हजारो नोंदणीकृत (Registration) शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सरकारी दराची 'हमी' (Guarantee) मिळाली नसतानाच आता पणन महासंघाने तूर खरेदीचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात २१ खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. शेतकऱ्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन (Online) नोंदणी करता येणार आहे. यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल. प्रति क्विंटल ७ हजार ५५० रुपये दर यापूर्वीच जाहीर केलेला आहे, हे विशेष.
सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण झाली आहे. खुल्या बाजापेठेत दर ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती हमीभाव खरेदी केंद्रांना होती. मात्र, सरकारने मुदत वाढवून न दिल्याने नोंदणीकृत २१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच आहे.
मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर असतानाच पणन महासंघाने आता तूर (Tur) खरेदीचा कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना २२ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येईल.
कुठे आहेत खरेदी केंद्र?
धाराशिव, टाकळी बॅ., चिखली, कनगरा, ढोकी, तुळजापूर, नळदुर्ग, कानेगाव, दस्तापूर, गुंजोटी, उमरगा, कळंब, शिराढोण, चोराखळी, वाशी, पारा, भूम, ईट, सोन्नेवाडी, पाथरूड आणि परंडा येथे हमीभाव खरेदी केंद्र देण्यात आली आहेत.
हमीभाव खरेदी केंद्रावर तूर घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. २४ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २२ फेब्रुवारीपर्यंत चालेल. शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी पूर्ण करावी.- एम. व्ही. बाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market Update :.....तर कापूस वापस करणार; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर