Join us

आयात शुल्क माफ केल्यामुळे बाजारात हरभरा दर गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 9:31 AM

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

विनायक चाकुरे

खरीप हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरामध्ये विक्रीविना पडून असून, रब्बी हंगामातील हरभऱ्याला मागील काही दिवसांपासून बाजारात चांगला दर मिळत होता. आता बाहेर देशातून आयात होणाऱ्या हरभऱ्यावरील ६० टक्के आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर देशातून पिवळ्या वाटाण्या सोबतच आता हरभऱ्यावरील आयात शुल्क माफ केल्यामुळे हरभऱ्याचे दर घसरले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहतात. खरिपाच्या पेरणी योग्य क्षेत्रापैकी ७० टक्के भागावर सोयाबीनची पेरणी करण्यात येते. परंतु मागील दोन वर्षापासून सोयाबीनचे दर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विक्रीविना घरीच साठवून ठेवला आहे.

खाद्य तेलावर नियंत्रण राहावे म्हणून सरकारकडून खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. दर वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन मागील सहा महिन्यापासून विक्रीविना ठेवलेला आहे.

हंगामाच्या सुरुवातीला ५ हजार २०० प्रतिक्विंटल असलेला दर घसरून आता ४ हजार ५५० पर्यंत खाली आला आहे. मात्र, आयातीत खाद्यतेलात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडे सोयाबीनला प्रक्रियादार कारखानदारांकडून मागणी होत नसल्याने आता सोयाबीन पाच हजाराचा तरी टप्पा गाठणार का नाही याबद्दल शास्वती नाही.

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे घटलेले उत्पादन आणि मिळणारा भाव पाहता यातून लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हरभऱ्यावरील आयात शुल्क हटवले

■ एकीकडे सोयाबीनची ही परिस्थिती असतानाच खरिपातील शेतकऱ्याच्या हाती आलेले हरभऱ्याचे पीकबाजारात आले असतानाच त्याला ६ हजार ९०० रुपये पर्यंतचा दर मिळत होता.

■ सरकारने जाहीर केलेला ५ हजार ४०० चा हमीभावापेक्षा जास्तीचा दर बाजारात मिळत असल्याने शेतकरी समाधानी दिसत असतानाच आता बाहेर देशातून व्यापाऱ्यांना आयात करावे लागणाऱ्या हरभऱ्यावरील आयात शुल्क पूर्णपणे कमी करण्यात आले आहे.

हरभऱ्याचे दर सहा हजारांपर्यंत

■ मार्केट यार्डात हरभऱ्याचे दर गडगडून सहा हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यासह काही देशातून हरभरा आता मोठ्या प्रमाणात आयात होणार आहे.

■ कडधान्यांमध्ये साठेबाजी करण्यात येऊ नये म्हणून सरकारकडून साठेबाजीच्या विरोधात पथक नेमून चौकशी होणार असल्याच्या भीतीने व्यापारी देखील खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत.

मागणी, पुरवठ्यावर दर अवलंबून

■ मागणी व पुरवठ्यावर कडधान्य व खाद्यतेलाच्या किमती अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडणाऱ्या घडामोडींचा देशांतर्गत शेतीमालावर परिणाम होत आहे.

■ मलेशियामध्ये मागील महिन्यात पाम तेलाच्या किमतीत पडझड झाल्यामुळे येणाऱ्या काळात आयात वाढणार आहे. त्यासोबतच देशात मोहरीचे उत्पादन चांगले झाल्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीन वर होऊ शकतो, असे व्यापारी बालाजी बच्चेवार यांनी सांगितले.

हेही वाचा - गूळ शेंगदाणे नियमित सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून होते सुटका; हाडेही होतात मजबूत

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीरब्बीपीकमार्केट यार्डविदर्भ