Join us

मंदावलेल्या पान बाजाराला गणपती बाप्पा पावला; 'गौरी गणपती'ने पान उत्पादक शेतकऱ्यांना केले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:30 IST

महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे.

दिलीप कुंभार 

महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे. चालू वर्षी पान व्यवसाय मंदीच्या खाईत लोटला गेला असताना गणपती बाप्पा व गौराईने दराची तेजी कायम ठेवत पान उत्पादक शेतकऱ्यांना मालामाल केले आहे.

सांगली जिल्ह्यातून पानमळ्यांचे सुमारे २६० हेक्टर क्षेत्र असून याठिकाणाहून राज्यभर व राज्याबाहेर खाऊची पाने एजंटामार्फत पाठविली जातात. याशिवाय कर्नाटकातील कागवाड व अथणी तालुक्यातूनही पानमळे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने याही ठिकाणी दराची तेजी कायम राहिली.

ही पाने सांगोला, पंढरपूर, धाराशिव, पुणे, मुंबई, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), फोंडा, लांजा आदी प्रमुख पान बाजारपेठेत पाठविली जातात. पाने कळी व फापडा अशा दोन प्रतीत पाठवतात. यावर पान उत्पादकांपासून पान वितरकापर्यंत सर्वांचे संसार अवलंबून आहेत. या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते.

पान दरात दुप्पट वाढ

• गेल्या चार महिन्यांपासून पानांना निचांकी दर मिळू लागल्याने पान व्यवसाय डबघाईस आला होता.

• गणपती येण्यापूर्वी ३०० पानांच्या एका कवळीचा दर २० ते ३० रुपये प्रति कवळी मिळत होता. म्हणजे १० कवळीच्या एका पानांच्या डप्यास २०० ते ३०० रुपये इतका निचांकी दर मिळत होता.

• मात्र गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच पान दरात दुप्पट वाढ झाली.

• ३ हजार पानांच्या एका डप्यास ४०० ते ६०० रुपये दर पान उत्पादकांना मिळाल्याने पान उत्पादकांनी गणपती बाप्पाचे आभार मानले आहेत. दरवाढीने शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचा : तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारसांगलीशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतीकर्नाटक