विनोद घोडे
भाववाढीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी अखेर मिळेल त्या दरात आपल्याकडील सोयाबीन विकून टाकले. मात्र आता खरिपातील पीक हाती येण्याच्या आधीच अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर व्यापाऱ्यांचा फायदा झाल्याचे बोलले जात आहे.
हमीभावापेक्षा कमी असला तरी सोयाबीनला वर्षभरातील उच्चांकी ४ हजार ७०० रुपये क्विंटल दर सध्या बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांजवळ सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे दरवाढीचा लाभशेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन सप्टेंबर अखेरपासून सुरू होणार आहे.
यंदा ५ हजार ३२८ रुपये हमीभावाचा फायदा शासन खरेदीमध्ये शेतकऱ्यांना होणार आहे. सध्याची दरवाढ त्याचा परिणाम असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. गतवर्षी दरवाढीच्या प्रतीक्षेत काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली.
परंतु दरवाढीची शक्यता नसल्याने पेरणीच्या तोंडावर मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. त्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या पदरी पडलेला नाही. त्यामुळे यंदा सोयाबीन पेरणी क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे.
वर्षभर सोयाबीनमध्ये मंदी
गतवर्षी सोयाबीनला ३ हजार ५००, तर वर्षभर चार हजार रुपयांचे आत भाव मिळाला. नाफेडची खरेदी उशिरा सुरू झाली व यामध्ये अटी-शर्तीचा भरणा होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन खासगी बाजारात विकले.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला, नफा घटला
बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत, मजुरी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत दरवर्षीच उत्पन्नात कमी व भावदेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ताळेबंद बिघडला असल्याचे दिसून येते.
सोयाबीनचे बाजारभाव (रुपये प्रतिक्विंटल)
६ ऑगस्ट - ४२५० ते ४५५९
७ ऑगस्ट - ४३५० ते ४७००
८ ऑगस्ट - ४४५० ते ४७२५
९ ऑगस्ट - ४४५० ते ४७५५
११ ऑगस्ट - ४४५० ते ४७५०
मागच्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ होता. नाफेडच्या अनेक जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात ३ हजार २०० ते ३ हजार ६०० रुपयात सोयाबीन विकले. बरेच महिने सोयाबीनचे भाव ३ हजार ६००ते ३ हजार ८०० रुपयांपर्यंत होते. आता कोणत्याच शेतकऱ्याजवळ सोयाबीन शिल्लक नाही. या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. हे दरवर्षीचेच असल्याने शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची गरज आहे. - प्रवीण भोयर, शेतकरी, चिकणी जि. वर्धा.
४३६ रूपयांची दरामध्ये झालीय वाढ
गतवर्षी केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये व यंदा ४३६ रुपयांची वाढ करण्यात येऊन ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. शासन खरेदीत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अडते काय म्हणतात...
सोयाबीनची आवक कमी आहे. त्यातच देशांतर्गत डीओसी दरवाढ झाली, हमीभाव देखील वाढले, प्लॉटद्वारे अखेरची खरेदी सुरू आहे व तेलाच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे सोयाबीनची दरवाढ झाली. - विरेंद्र भुसारी, अडते, बाजार समिती, वर्धा.
यंदाच्या हंगामात सोयाबीनचा पेरा किती?
तालुका | क्षेत्र (हे. आर) |
आर्वी | १४,५७१ |
आष्टी | ८,१९९ |
कारंजा | ११,६५५ |
वर्धा | १९,६८० |
सेलू | १८,२८९ |
देवळी | १७,३५० |
हिंगणघाट | १६,८५० |
समुद्रपूर | २३,५१६ |