Join us

गोडेतेलाच्या दरातील घसरण; सोयाबीनच्या मूळावर.. किती दिवस ठेवायचे घरात सोयाबीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:27 IST

सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली गेले असून, सरासरी प्रतिक्विंटल ४४५० रुपयांनी विक्री करावी लागत आहे. हमीभावापेक्षा दीडशे रुपये कमी दराने विक्री होत आहे.

दर नाही म्हणून सोयाबीन घरात किती दिवस ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, आता विक्रीशिवाय पर्याय नाही. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही दर खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

जानेवारीच महिना बरा..जानेवारी महिन्यात घाऊक बाजारात सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ४७४२ रुपये होता. मार्चमध्ये तोच दर ४४५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच सोयाबीनची विक्री केली असती तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

एका बाजूला तेलबियांचे क्षेत्र वाढावे यासाठी शासन प्रयत्न करत असताना सोयाबीनला हमीभावही मिळत नसेल तर हे पीक का घ्यावे, असा सवाल शेतकरी करत आहेत.

गोडेतेलाच्या दरातील घसरण कारणीभूत• गेल्या वर्ष-दीड वर्षापासून गोडेतेलाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे दर कमी झाले आहेत.• सध्या सरकी, सोयाबीन, सूर्यफूल तेलाचे दर ९० ते १०० रुपये किलो आहेत. हे वाढल्या शिवाय सोयाबीनच्या दरात वाढ होणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपेना• सोयाबीन उत्पादकांच्या मागचे शुक्लकाष्ठ संपत नाही. गेल्या दोन वर्षापासून दरात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादन खर्चही मिळत नाही.• परिणामी, यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड कमालीची घटली होती. यावर्षी तरी चांगला दर मिळेल, या अपेक्षेवर शेतकरी होते, मात्र यंदाही त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.

गेल्या दोन महिन्यांतील सोयाबीनचे घाऊक बाजारात दर, प्रतिक्विंटल

तारीखकिमानकमालसरासरी
२० जानेवारी४७१५४७५०४७२१
२० फेब्रुवारी४४२५४४८०४४५०
४ मार्च४३१०४४४५४४४७
टॅग्स :सोयाबीनबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकोल्हापूरशेतकरी