Join us
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा ७४० कोटींची, मिळाले फक्त ४४५.९८ कोटी; २९५ कोटी रुपयांचे धान चुकारे अजूनही प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:09 IST

Dhan Kharedi : अंदाजे ३१.५ लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे ७४० कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी, अजूनही सुमारे २९५ कोटी रुपये येणे आहेत.

भंडारा जिल्ह्यातून अंदाजे ३१.५ लाख क्विंटल धान खरेदीपोटी सुमारे ७४० कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत. त्यापैकी बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी ही रक्कम वळती करण्यात आली असली तरी, अजूनही सुमारे २९५ कोटी रुपये येणे आहेत. ही उर्वरित रक्कम नेमकी कधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे अडलेले चुकारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. या चुकाऱ्यांसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ४४५ कोटी ९८ लाख २८ हजार ३५ रुपयांचा निधी मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याची प्रक्रियासुद्धा पणन कार्यालयाने सुरू केली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेली धान खरेदी भीम पोर्टलवर १ डिसेंबरपासून नोंदविण्यात आली होती. यातील तब्बल तीन महिन्यांत धानाचे चुकारे थांबलेले होते. चुकाऱ्यांना होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण वाढतच चालला होता. यामुळे सर्व स्तरातून ही मागणी वाढायला लागली होती.

वाढीव लक्षांकसुद्धा लवकरच

भंडारा जिल्ह्याला यापूर्वी दोनदा धान खरेदीचे लक्षांक वाढवून मिळालेले आहे. तरीही बरीच खरेदी शिल्लक आहे. लोकप्रतिनिधींनी शासनाकडे धान खरेदीची आपबीती कळवली. त्यावर शासनाने सकारात्मकता दाखवीत वाढीव लक्षांकाची आशा बळावली आहे.

३१ डिसेंबरपर्यंतचे चुकारे मिळण्याची शक्यता

जिल्हा पणन कार्यालयाने खरेदीकेंद्र अंतर्गत दोन हुंड्या मागविल्या आहेत. एकूण खरेदी रक्कम व प्राप्त झालेली धानाची राशी बघता ३१ डिसेंबरपर्यंत चुकारे होण्याची आशा बळावली आहे.

धान खरेदीची रक्कम आलेली आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे चुकारे केले जातील. चुकाऱ्याची प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे. वाढीव लक्षांकाची मागणी नोंदविली आहे. - सुधीर पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.

जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना सूचना

• शेतकऱ्यांना हे चुकारे अदा करताना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी धानसाठा व लॉट एंट्री तपासून पेमेंट अदा करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

• ज्या खरेदी केंद्रावर लाट एंट्रीनुसार धानसाठा उपलब्ध नसेल अशा खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याकरिता बँक व्हेरिफिकेशन करताना ज्या प्रमाणात धानसाठा उपलब्ध असेल त्या प्रमाणातच शेतकऱ्यांचे बँक व्हेरिफिकेशन करण्याबाबत खरेदी संस्थांना सूचित करण्यात यावे. 

• त्यानुसार बँक व्हेरिफिकेशन केलेले आहे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व लेखापाल यांनी व्यक्तिशः खात्री करून शेतकरी चुकारे अदा करावेत, अशा सूचना आहे.

• खरेदी केंद्राकडे ज्या प्रमाणात धानसाठा उपलब्ध आहे, त्या प्रमाणातच खरेदीच्या हुंड्या स्वीकारण्याबाबत जिल्हा मार्केट अधिकारी यांनी खबरदारी घ्यावी. धानसाठा उपलब्ध नसताना फक्त लाट एंट्री तपासून शेतकरी चुकारे अदा करण्यात येऊ नयेत, अशा सूचना आहे. 

हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Bhandara Farmers Await Rice Payment: Crores Pending, More Expected Soon

Web Summary : Bhandara farmers are receiving delayed rice payments. While ₹445.98 crore has been released against ₹740 crore due, ₹295 crore is still pending. Payments till Dec 31, 2025 will be cleared. Increased procurement targets are expected.
टॅग्स :बाजारसरकारभातशेतकरीविदर्भशेती क्षेत्र