Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोडावूनही उपलब्ध, नोंदणीही केली, तरी मका खरेदी रखडली; खाजगी व्यापाऱ्यांच्या मनमानी दरांपूढे शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:53 IST

शेवगाव तालुक्यात मक्याचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झालेले आहे. असे असूनही मका खरेदी रखडली आहे. तहसीलदार दहाडदे यांनी मका खरेदीसाठी गोडाऊनदेखील उपलब्ध करून दिले असून, तसे पत्र जिल्हा पणन अधिकारी यांना दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात मक्याचे हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झालेले आहे. शेतकऱ्यांनी २५ हजार क्विंटल मक्याची नोंदणीही पूर्ण केली आहे. असे असूनही मका खरेदी रखडली आहे. प्रत्यक्षात तहसीलदार आकाश दहाडदे यांनी मका खरेदीसाठी गोडाऊनदेखील उपलब्ध करून दिले असून, तसे पत्र जिल्हा पणन अधिकारी यांना दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मक्याला २४०० रुपये क्विंटल हमीभाव आहे. खासगी व्यापारी इतर ठिकाणी २ हजार ते २१०० रुपये भाव देतात. महाराष्ट्रात हाच भाव १७०० ते १९०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी हमीभावाने मका विक्रीसाठी शासकीय मका खरेदी केंद्रात नोंदणी करीत आहेत.

नाथकृपा बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्याकडे आतापर्यंत २५ हजार क्विंटल मक्याची नोंद शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे, परंतु पणन आणि तहसील कार्यलयातील समन्वयाअभावी प्रत्यक्षात मका खरेदी रखडल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून खरीप पणन हंगाम २०२५-२०२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या भरड धान्याची साठवणूक करण्यासाठी शासकीय गोदाम उपलब्ध करून दिले आहे.

मात्र, भरड धान्याची प्रतवारी करण्याकरिता ग्रेडरची नेमणूक पणन अधिकाऱ्यांनी करावी. तसेच भरड धान्य साठवणुकीदरम्यान त्यातील आर्द्रता कमी होऊन वजनामध्ये तूट निर्माण झाल्यास आमचे कार्यालय कोणतेही जबाबदारी स्वीकारणार नाही, असे पत्र शेवगाव तहसीलदारांनी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना दिले आहे.

याबाबत पणन अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, याबाबत सोमवारी (दि. १९) याबाबतचे एक पत्र तहसील कार्यालयाला देणार असल्याचे बी. आर. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे याबाबतचा नेमका तोडगा निघावा आणि मका केंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे, अशीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

बाजारात मक्याचे भाव मागील वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत ३०० ते ५०० रुपयांनी कमी आहेत. गेल्या दोन वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढली होती. यंदा मात्र मोलॅसिस आणि उसाचा रस, तसेच तांदूळ उपलब्ध झाल्याने मक्याच्या मागणीत काहीशी तूट जाणवत आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाल्याने हमीभावाने मका केंद्र लवकरात लवकर सुरू होऊन शेतकऱ्यांची मका खरेदी सुरू व्हावी. व्यापाऱ्यांकडून कमी भावाने मका खरेदी केली जात आहे. - तुषार जाधव, शेतकरी, भावीनिमगाव.

हेही वाचा : कडधान्य खाण्याची सुद्धा असते योग्य पद्धत! जाणून घ्या याच गुणकारी पद्धतीविषयी अधिक माहिती

English
हिंदी सारांश
Web Title : Shevgaon Farmers Await Maize Purchase Despite Registration, Godown Availability

Web Summary : Despite registration and godown availability, maize purchase is delayed in Shevgaon. Farmers worry due to low private trader rates compared to the promised support price of ₹2400/quintal. Coordination issues hinder government purchase center operations.
टॅग्स :मकाशेती क्षेत्रबाजारशेतकरीअहिल्यानगरमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती