Join us

Papaya Market पपईचे भाव गडगडल्याने उत्पादन खर्चही निघेना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 10:57 AM

बाजार दरांसह, वाढत्या तापमानाचा पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका

गत महिना-दीड महिन्यापासून तापमानाने उच्चांक गाठला असून दुपारच्या वेळी बाहेर पडणेही कठीण होत आहे. वाढत्या उन्हामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असून, पपईचे पीक खराब होत आहे. त्यातच पपईचा भावही एकदम खाली आल्याने उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

कौठा व परिसरातील महमदपूरवाडी, पिंपराळा, बोराळा, खुदनापूर, किनोळा आदी भागांत पपईचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. गत काही महिन्यांपासून पपईला मागणीही चांगली असल्याने या भागात उत्पन्न चांगले निघते; परंतु मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे पपईचे भावही एकदम गडगडल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

सद्यःस्थितीत वाढत्या तापमानाने पपई वेळेपूर्वीच पिवळी पडत आहे. तर अनेक कोवळी पपई जागेवरच सुकून जात असून गळूनही पडत आहे. प्रखर उन्हामुळे फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे सद्यःस्थितीत बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो ठोक भाव मिळत असल्याने पपई विकावी वाटत नाही. दुसरीकडे पपई जागेवरच खराब होत असल्याने नाइलाजाने ती बाजारात विकावी लागत आहे.

उन्हाबरोबरच पपईवर अनेक रोगांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे अतिशय कमी भावात बाजारपेठेत पपई पीक विकावी लागत आहे. त्यामुळे या पिकासाठी घेतलेली मेहनत आणि उत्पादन खर्चही भागत नसल्याचे

साहेब, खर्च करूनही भाव मिळत नाही..!

मागच्या महिना-दीड महिन्यांपासून प्रखर ऊन पडले आहे. त्यामुळे पपईचे मोठे नुकसान होत आहे. अनेक फळे पिवळी पडून जागेवरच गळून पडत आहेत. त्यामुळे भावही चांगला मिळत नाही. तरीसुद्धा नाइलाजाने पपई विकावी लागत आहे. शासनाने आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी. - राजू काशीनाथ खराटे, शेतकरी, कौठा

यावर्षी पपई उत्पादक शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. एकतर बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसत असून बाजारात भावही म्हणावा तसा मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले आहे. मध्यंतरी झालेल्या वादळाचा फटका पपईला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. - नारायण दासे, शेतकरी, महमदपूरवाडी

हेही वाचा - कृषी पर्यटन; शेतकरी बांधवांसाठी एक शेतीपुरक व्यवसाय संधी  

टॅग्स :फळेबाजारशेतीशेतकरीउष्माघातमार्केट यार्ड