Join us

Draksh Bajar Bhav : ढगाळ हवामानाची भीती घालून द्राक्ष व्यापाऱ्यांचा दर पाडण्याचा प्रयत्न ; कसा मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:41 IST

खानापूर घाटमाथ्यांवरील द्राक्ष हंगाम सुरू असून सुलतानगादे परिसरातील द्राक्षांना ४ किलोला ३६० ते ३८० रुपये दर मिळाला आहे.

संदीप मानेखानापूर : खानापूर घाटमाथ्यांवरील द्राक्ष हंगाम सुरू असून सुलतानगादे परिसरातील द्राक्षांना ४ किलोला ३६० ते ३८० रुपये दर मिळाला आहे.

काही व्यापारी शेतकऱ्यांना ढगाळ हवामानाची भीती घालून दर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे द्राक्षबागायतदार संघ, शेतकरी संघटनांकडून आवाहन केले आहे.

खानापूर घाटमाथ्यावरील पळशी, हिवरे, बलवडी (खा), सुलतानगादे, करंजे, बेनापूर या गावात निर्यातक्षम व देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या द्राक्षबागांचे प्रमाण जास्त आहे.

अनेक द्राक्षबागा विक्री योग्य झाल्या आहेत त्यामुळे या भागात अनेक द्राक्ष व्यापारी दाखल होत आहेत. डिसेंबरमध्ये सुलतानगादे परिसरातील द्राक्ष बागायतदारांनी चार किलोस ४०० ते ४२० याप्रमाणे द्राक्षमाल विक्री केला आहे.

सध्या बलवडी (खा) परिसरातील द्राक्षबागांची चार किलोस ३६० ते ३८० रुपयाप्रमाणे काढणी सुरू आहे. मात्र काही व्यापारी ढगाळ वातावरण व थंडी यामुळे द्राक्षमालाला उठाव नसल्याचे सांगून द्राक्षबागा कमी भावाने खरेदी करू लागले आहेत.

यावर्षी अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे हैराण झालेल्या द्राक्ष बागायतदारांची चिंता या अफवामुळे वाढली आहे. याचा फायदा घेऊन व्यापारी परिसरातील द्राक्षबागा कमी दराने खरेदी करत आहेत.

थंडी कमी झाल्यानंतर द्राक्ष मागणी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन कमी दराने द्राक्ष विक्री करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये व अशा पद्धतीने द्राक्ष दर पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कृषी विभागाकडे करणार आहे. - सिद्धेश्वर गायकवाड, जिल्हाप्रमुख, शेतकरी सेना

अधिक वाचा: PGR in Grape : कृषी सल्लागार अन् पीजीआरला हवी कायद्याची चौकट

टॅग्स :द्राक्षेबाजारमार्केट यार्डशेतकरीसांगलीपीक