Dal Market : मागीलवर्षी साधारण याच महिन्यात तूरडाळीचेTur dal भावRate गगनाला भिडले होते. दोनशे रुपये किलोपर्यंत तूरडाळीचे भाव गेले होते. परंतु, यावर्षी तूरडाळीचे भाव मागील वर्षीपेक्षा कमी झाले आहेत.
खरंतर मागील एक महिन्यातच तूरडाळीचे भाव चांगलेच खाली आले आहेत. बाजारामध्ये नवीन मालाची आवक वाढल्याने तुरीचे भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
डाळीचे भाव कोसळत असल्याने ग्राहकांना आनंद होत असला, तरी शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणातील डाळ ही अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात डाळीचा वापर केला जातो.
तुरीची डाळ ही इतर डाळींपेक्षा पौष्टिक मानली जाते. त्यामुळे इतर डाळींपेक्षा तुरीच्या डाळीलाच सर्वाधिक मागणी असते. शहरासह ग्रामीण भागातही तुरीच्या डाळीचे वरण प्रसिद्ध आहे. हॉटेल व्यवसायातही तूरडाळीच्या पदार्थांना जास्त मागणी असते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी जेवणाच्या ताटातून दुर्मिळ झालेले वरण पुन्हा पहायला मिळणार आहे.
नवीन मालाची आवक वाढल्याने फायदा
सध्या सर्वच प्रकारच्या डाळींची बाजारामध्ये आवक वाढली आहे. तसेच हिवाळ्यातील भाजीपाल्यामुळे डाळींची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे डाळींचे दर उतरले.
तूरडाळ आणखी स्वस्त होणार
* तूरडाळीचा अनेक पदार्थासाठी वापर केला जातो. त्यामुळे इतर डाळींपेक्षा सर्वात जास्त मागणी तूरडाळीला असते.
* सध्या तूरडाळीचा भाव १२० रुपये किलोच्या आसपास आहे. हेच भाव येणाऱ्या काळात आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून वर्तविली जात आहे.
ताटात पुन्हा वरण दिसू लागलं
काही महिन्यांपूर्वी तुरीच्या डाळीचे भाव दोनशे रुपये किलोच्या आसपास गेले होते. सामान्य ग्राहकांना हे भाव परवडणारे नव्हते. त्यामुळे तुरीच्या डाळीची मागणीही कमी झाली होती. नागरिकांकडून तुरीच्या डाळीच्या वरणाऐवजी इतर डाळींचा पर्याय वापरला जात होता. परंतु, आता भाव आटोक्यात आल्याने पुन्हा ताटात वरण दिसणार आहे.
लग्नसराईत किंचित दिलासा
* आता लवकरच लग्नसराईचा हंगाम चालू होणार आहे. जेवणावळीमध्ये डाळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यामुळे या काळात डाळीची मागणी वाढते. परंतु, सध्या किंमत कमी असल्यामुळे लग्नसराईत किंचित आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारामध्ये डाळीचा नवीन माल येणे सुरू झाले आहे. तसेच हिवाळ्यातील भाजीपाला स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडून डाळीची मागणी कमी झाली आहे. परिणामी, डाळीचे भावही कमी झाले आहे. आगामी काळात ते पुन्हा किंचित कमी होण्याची शक्यता आहे. - कासम मुसानी, ठोक धान्य विक्रेते
कोणती डाळ किती रुपयांनी स्वस्त?
डाळ | महिन्यांपूर्वी | सध्याचे दर |
तूर | १७० | १२० |
हरभरा | ८५ | ५५ |
उडीद डाळ | १२० | १०५ |
मूग डाळ | ११० | ९० |
मसूर डाळ | ९५ | ९० |
हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र नावालाच; कधी बंद तर कधी चालू ?