अशोक डोंबाळे
भारतात बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे प्रथमच दरात तेजी होती. मागील आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. या दरामुळे शेतकरी, व्यापारी खूश झाले; पण, व्यापारी, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद आठ दिवसही टिकला नाही.
चिनी बेदाण्याचा भारतात शिरकाव झाल्यामुळे आठ दिवसांत २५ टक्के बेदाण्याचे दर उतरल्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांची झोपच उडाली आहे. महाराष्ट्रात अजून ६० हजार टन बेदाणा शिल्लक आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षांत बेदाण्याचे उत्पादन दोन लाख ५० हजार टनापर्यंत झाले होते. २०२४-२५ वर्षात द्राक्षाचे उत्पादन घटल्यामुळे दर तेजीत राहिल्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात झाली. बेदाण्यासाठी खूप कमी द्राक्ष आली. यामुळे केवळ एक लाख ७० हजार टनच बेदाण्याचे उत्पादन झाले. बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे एप्रिलपासूनच दरात तेजी कायम राहिली. सुरुवातीला प्रति किलो २५० ते ३०० रुपये बेदाण्याचे दर होते.
यामध्ये वाढ होत जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या दर्जाच्या बेदाण्याला प्रति किलो ५०० ते ६०० रुपये असा विक्रमी दर मिळाला; पण, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद फार काळ टिकला नाही. चिनी बेदाण्याचा भारतात शिरकाव झाला आणि देशातील बेदाण्याचे दर २५ टक्क्यांनी दणक्यात उतरले.
केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे तक्रारी : कैलास भोसले
चीनचा बेदाणा देशात विक्रीसाठी आल्याबद्दल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. केंद्र सरकारने तत्काळ चीनचा बेदाणा कुठून कसा आणि किती आला, याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य शासनाकडूनही चीनच्या बेदाण्याची चौकशीची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे, अशी माहिती द्राक्षबागायतदार संघाचे राज्याध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली आहे.
बेकायदा आयातीमुळे देशाचे नुकसान : अजित पवार
• चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची आयात होत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी.
• दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे.