बाळासाहेब काकडे
अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे कापसाला बाजारपेठेत अवघा प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याचे दरही मोठ्या प्रमाणात कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर शिमगा साजरा करण्याची वेळ आली आहे.
गेल्या दहा वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यात कापूस लागवडीचे क्षेत्र मोठ्या वाढले आहे. यंदा १५ हजार हेक्टरवर कापसाचा लागवड झालेली आहे. यंदा कापसाला महागाईच्या प्रमाणात १० हजार ते ११ हजार क्विंटल इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु केंद्र सरकारने मोठ्या कॉटनचा धागा आयात करण्यास परवानगी दिली. व्यापाऱ्यांनी धागा आयात करून ठेवला आहे.
त्यामुळे भारतातील कापूस शेती आणि जिनिंग मिल उद्योग धोक्यात आला आहे. एका बाजूला स्वदेशीचा नारा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला परदेशी माल आयात करायचा त्यामुळे उद्योजक लाइन भक्कम झाली आहे आणि कृषी लाइन सलाइनवर आली आहे.
कापसाप्रमाणेच कांद्याच्या भावाचीही अवस्था आहे. कांदा एक ते दीड रुपया किलोने शेतकऱ्याकडून खरेदी केला जात आहे. हाच कांदा हशरातील मॉलमध्ये ३० ते ४० रुपये किलोने विकला जात आहे. चार ते पाच महिने पाणी, खते, औषधे वापरून कांदा पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती धोंडा अशी अवस्था आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
शासन शेतकरी हिताचे नव्हे तर उद्योजकांच्या हिताचे धोरण राबवत आहे. अतिवृष्टीमुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी आता पिकांना चांगला दर मिळत नसल्याने आणखी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजारांचे गाजर दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालाचे भाव कमी करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचे, ही सरकारची पद्धत आहे. - हरिदास शिर्के, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट).