वसमत : कापसाची हमीभाव दराने खरेदी केंद्र (CCI) सुरू असली तरी केंद्रावर कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची (Farmer) विचारपूस केली जात नाही. एवढेच काय, शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाडीला डावलत व्यापाऱ्यांच्या वाहनांचे मोजमाप आधी केले जात आहे. याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
महिनाभरापासून बाजारपेठेत (Market yard) कापूस येणे सुरू झाले आहे; परंतु शेतकऱ्यांच्या कापसामध्ये त्रुटी काढल्या जात असून व्यापाऱ्यांच्या (Traders) वाहनांतील कापसाचे मोजमाप अगोदर केले जात आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक राहिल्यामुळे शेतकऱ्यांची कापसाची लागवड केली आणि आता कापूस बाजारपेठेत येणे सुरू झाला आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. कापसाला हमीभाव ७ हजार ४२१ रुपयांचा दर्जानुसार दर मिळतो; परंतु बाजारात आजघडीला ६ हजार ते ६ हजार ५०० एवढा भाव कापसाला मिळत आहे.
अशा परिस्थितीमुळे शेतात कोणते पीक घ्यावे हेच तर शेतकऱ्यांना कळत नाही. एक ना अनेक संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गाडीबैल व इतर वाहनांनी कापूस आणला तर आधी व्यापाऱ्यांच्या वाहनांचे मोजमाप केले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
'या' ठिकाणी कापसाची खरेदी
* वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा, औंढा नागनाथ तालुक्यातील वाघी फाट्यावरील जिनिंगवर कापसाचे हमीभाव खरेदी केंद सुरू आहेत. या केंद्रावर शेतकऱ्यांची वाहने कमी व व्यापाऱ्यांची वाहने मोठ्या प्रमाणात उभी राहत आहेत.
* कापूस खरेदी केंद्रावर कापसाचा दर्जा दाखवल्या जात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नाही. कापसामध्ये त्रुटीचे प्रमाण अधिक काढले जात आहे.
जाणीवपूर्वक काढल्या जातात त्रुटी
गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या वाहनांचे मोजमाप आधी केले जात असून, शेतकऱ्यांच्या वाहनाकडे लक्ष दिले जात नाही. दुसरीकडे कापसामध्ये त्रुटीही काढल्या जात आहेत. त्यामुळे कापसाचे उत्पन्न घ्यावे की नाही? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : रुईच्या झडतीवर ठरतो कापसाला भाव; शेतकऱ्यांना दरवाढीची आस