राजरत्न सिरसाट
अकोला : राज्यात आतापर्यंत ७४ लाखांवर गाठी खरेदी केल्या आहेत. परंतु दर वाढीच्या प्रतीक्षेत अद्यापही शेतकऱ्यांकडे १० टक्के कापूस आहे. सरकीच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने कापसाच्या दरातही प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. (Cotton Market)
चालू खरीप हंगामात मध्यम कापसाला ७,१२१ रुपये, लांब धाग्याच्या कापसासाठी ७,५२१ रुपये हमीदर शासनाने जाहीर केलेले आहेत. तथापि कापसाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांकडचा १० टक्के वगळता सर्व कापूस विक्री झाला आहे, असे असताना शेतकऱ्यांना हमीदर मिळाला नाही. (Cotton Market)
परंतु या आठवड्यात सरकीच्या दरात प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपये वाढ झाली आहे. यामुळे कापसाच्या दरातही प्रतिक्विंटल वाढ झाली असून, सध्या बाजारात कापसाला ७,३०० ते ७,४०० रुपये दर मिळत आहेत. परंतु, शेतकऱ्यांनी जवळपास कापूस विकला असून, राज्यात १० टक्के म्हणजे १० ते १५ लाख गाठीच विकायच्या शिल्लक आहेत. (Cotton Market)
आतापर्यंत सरकीचे दर प्रतिक्विंटल ३,२०० ते ३,३०० रुपये होते. यात सुधारणा होऊन हे दर प्रतिक्विंटल ३,५०० ते ३,६०० रुपयांवर पोहोचले आहेत. याचा परिणाम कापुस दरवाढीत झाला आहे. (Cotton Market)
देशात २७० लाख कापूस गाठींची खरेदी
देशात जवळपास एकूण २६० ते २७० लाख गाठींची खरेदी झाली असून, भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) जवळपास १ कोटी कापूस गाठींची खरेदी केली असून, गतवर्षीचा ११.५० लाख व नवीन कापसाच्या १२ लाख गाठी सीसीआयने विक्री केल्या आहेत.
सरकीच्या दरात प्रतिक्विंटल ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाल्याने कापसाच्या दरातही वाढ होऊन कापसाला प्रतिक्विंटल ७,४०० ते ७,५०० रुपये वाढ झाली आहे. १० टक्के कापूस अद्याप शेतकऱ्यांकडे आहे. दरम्यान, राज्यात यंदा जवळपास ७४ लाख गाठींवर कापसाची खरेदी झाली आहे.- राजकुमार रुगंठा, अभ्यासक कृषी शेतमाल, अकोला.