मारेगाव तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यात हाती आलेल्या कापसालाही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या.
त्यामुळे खासगी कापूसबाजारात दिवाळीनंतरही कापसाची तुरळक आवक होती; परंतु गेल्या दहा दिवसांपासून 'सीसीआय' बाजारात कापूस खरेदीसाठी आल्याने बाजाराचा नूर बदलला आहे.
मागील १० दिवसांत मारेगाव तालुक्यात सीसीआयने तब्बल ५७ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली असून, यामुळे बाजारात तेजी आली आहे.
सीसीआयकडून मारेगाव तालुक्यातील बाजार समितीच्या माध्यमातून मारेगाव येथे तीन जिनिंगमध्ये तर मार्डी येथील एका जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी सुरू आहे.
या कापसाला केंद्र शासनाने जाहीर केलेला ७ हजार ५२१ रुपयांचा दर जाहीर झाला होता. मात्र, तालुक्यात सीसीआयची कापूस खरेदी उशिरा सुरू झाल्याने ग्रेड कमी झाले. सध्या कापसाच्या प्रतवारीनुसार ७ हजार ४७१ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात येत आहे.
कापसाचे दर स्थिर
कापसाचे दर स्थिर असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवून सीसीआयला कापूस विकत आहेत. सध्या सर्व केंद्रांवर कापूस काटा करून नोंदणी होत आहे. कापूस विक्री केल्याची रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत असल्याने सोय झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोट्यवधीची उलाढाल वाढली
* गेली काही वर्षे तालुक्यात सीसीआयची कापूस खरेदी नसल्याने तालुक्यातील कापूस बाहेर जात होता. त्यामुळे ५० हजार क्विंटलचा टप्पाही गाठला जात नव्हता.
* प्रारंभी, खासगी व्यापाऱ्यांनी कापसाला सात हजार ५०० रुपयांचा दर दिल्याने आवक कमी होती. खासगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत नऊ हजार क्विंटल कापूस खरेदी केल्याची माहिती आहे.
* तालुक्यातील कापूस आवक वाढल्याने बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. या उलाढालीमुळे बाजाराला गती आली आहे. येत्या काळात ही आवक सुरू राहिल्यास १ लाख क्विंटलचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे.