Cotton Market: दिवाळीपासून भाववाढीची अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता; मात्र अनेक दिवसांपासून साठवलेल्या कापसावर आता बारीक किडींचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. (Cotton Market)
दरम्यान, खरीप हंगामासाठी बी-बियाणे आणि रासायनिक खते खरेदीसाठी आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांना आता मिळेल त्या दरात कापूस विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Cotton Market)
आगामी खरीप हंगामासाठी मशागत व पेरणीची तयारी सुरू असताना, कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. सध्या कापसाला केवळ ७,६०० रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळत असून, अपेक्षित भाववाढ न झाल्याने शेतकऱ्यांना तोट्यात कापूस विकण्याची वेळ आली आहे. (Cotton Market)
गेल्या काही दिवसांपासून भाववाढीची अपेक्षा फोल ठरली असून, शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (Cotton Market)
खर्च जास्त, नफा कमी !
कापसाचे उत्पादन घेण्यासाठी खर्चात वाढ झालेली आहे. कापूस वेचणीसाठी १० रुपये किलो दर मजुराला द्यावे लागतात. फवारणी व इतर खर्च वाढला. तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. कापसाला ७,६०० रुपये प्रति क्विंटल भाव आहे.
कापूस विक्री करण्यास भाग पडताहेत
* शेतकऱ्यांना सुरुवातीला भाववाढीची आशा होती. मात्र, आता मे महिना उजाडला तरीही दरात वाढ न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत.
* शेतीसाठी आवश्यक असलेली मान्सूनपूर्व मशागत, बी-बियाणे, खते आणि इतर निविष्ठा खरेदीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करणे भाग पडत आहेत.
* मात्र, कापसाचे दर आणि शेतीच्या खर्चात प्रचंड तफावत निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
साडेचार हजारांनी भाव कमी
* दोन वर्षांपूर्वी कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांप्रमाणे भाव मिळाला होता. त्यामुळे कपाशी लागवड क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र, सद्यः स्थितीत १२ हजार रुपयांच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रुपये कमी भाव मिळत आहे.
* दोन वर्षात साडेचार हजार रुपयांनी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाच्या भाववाढीची शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
* एकीकडे खत व बियाणांचे दर वाढलेले असताना शेतमालालाच योग्य भाव का मिळत नाही, असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
* तालुक्यात एकूण १७,४५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती.
* इतर पिकांच्या तुलनेत कापसाला अधिक चांगला दर मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; परंतु शेवटी त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Seeds : कापूस उत्पादकांच्या खिशाला बसणार महागाईची झळ वाचा सविस्तर