अकोला : भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय)CCI आतापर्यंत ४० लाख (७.६ लाख बेल्स) क्विंटल कापूस खरेदी केला आहे. कापसाचा हमीदर यंदा प्रतिक्विंटल ७ हजार ५२१ रुपये केंद्र शासनाने जाहीर केला आहे.
तथापि, कापसाची प्रत बघून कापूस खरेदी केला जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडील दर्जेदार कापूस शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करण्यात येणार असल्याचे सीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
यंदा पावसामुळे आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राज्यात कापसाचे भाव किमान आधारभूत किंमतीच्या खाली आहेत. अकोल्याच्या कापूस बाजारात गुरुवारी(१९ डिसेंबर) रोजी सरासरी प्रतिक्विंटल दर ७ हजार ४०८ रुपये मिळाला. जास्तीत जास्त दर ७ हजार ४७१ रुपये तर कमीत कमी दर ७ हजार ३३१ रुपये एवढा होता. हा दर हमीभावापेक्षा कमी आहे.
यामुळे खासगी बाजारात निकृष्ट दर्जाचे कारण देऊन परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांढरा कापूस (कच्चा कापूस) रंग खराब होणे, स्टेपलची लांबी कमी होणे आणि आर्द्रतेचे कारण सांगून कापसाची खरेदी केली जात असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. असे असले तरी यंदा खासगीपेक्षा सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.
जिल्ह्यातील तीन केंद्रांवरील कापूस खरेदी बंद
अकोला जिल्ह्यातील निबी मालोकार येथील श्रध्दा जिनिंग, कापसीचे कॉट फायबर व बोरगाव मंजू येथील अजमेरा जिनिंग या ठिकाणी सुरू असलेली कापूस खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. येथे सीसीआयचे खरेदी केंद्र आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे सीसीआयच्या सूचनेनुसार हे केंद्र १९ डिसेंबरपासून बंद ठेवण्यात आल्याचे या जिनिंगच्या संचालकांनी एका पत्राने जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणू नये, असेही त्या पत्रात नमूद केले आहे.