Join us

महाराष्ट्रातील कापसाची थेट मध्यप्रदेशात विक्री; वाढीव दर अन् 'ही' आहेत कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 14:01 IST

यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे उत्पादन घटले असून शेतकरी कापूस घरात येताच विक्री करत आहे. मात्र सीसीआयचे खरेदी केंद्र अध्यापही अनेक ठिकाणी बंद आहे. यातच रोख पैसे आणि वाढीव दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी घेऊन जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. काही भागांत कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिके खराब झाली होती.

आधीच हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे. यातच सीसीआयचे नंदुरबार आणि शहादा येथील केंद्र बंद असल्याने जिल्ह्याचा कापूस खेतिया (मध्यप्रदेश) येथे विक्रीसाठी रवाना होत आहे.

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पावसाने वेळोवेळी दिलेला खंड, त्यानंतर काही भागांतील अतीवृष्टी, पुन्हा ढगाळ हवामान यामुळे कापूस पिकाची गुणवत्ता घटली होती.

यात भरीस भर म्हणून जिल्ह्यात बहुतांश भागात कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. यामुळे उत्पादनात घट झाली आहे.

'सीसीआय'ची केंद्रे बंदच

• नंदुरबार जिल्ह्यात शहादा आणि नंदुरबार या दोन ठिकाणी सीसीआयची केंद्रे आहेत. ही दोन्ही केंद्रे दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. तोवर बहुतांश शेतकरी खेतिया (मध्य प्रदेश) येथील बाजारात कापूस विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.

• या ठिकाणी व्यापारी कापसाला प्रतिक्विंटल कमीत कमी ६ हजार २०० ते जास्तीत जास्त ७ हजार ६३५ रुपयांचा दर मिळत आहे.

• पैसेही रोख मिळत असल्याने शेतकरी येथे हजेरी देत आहेत. शहादा मार्गाने खेतियाकडे कापूस घेऊन जाणारे शेतकरी सध्या नजरेस पडत आहे. सीसीआयने प्रतिक्विंटल ७ हजार ७१० रुपयांचा हमीभाव केंद्रीय स्तरावरून जाहीर केला असला, तरी खरेदी केंद्र प्रत्यक्षात सुरू होण्यास नोव्हेंबर अखेर उजाडणार आहे.

• यामुळे शेतकरी खासगी विक्रेते किंवा लगतच्या मध्य प्रदेशातील खेतिया बाजारात कापूस विक्री करत आहेत.

हेही वाचा : उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's cotton goes to Madhya Pradesh for better prices.

Web Summary : Nandurbar farmers are selling cotton in Madhya Pradesh due to crop damage and closed CCI centers. Higher prices and immediate cash payments in MP are attracting farmers despite lower quality.
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रविदर्भमध्य प्रदेशकापूसशेतकरी