मंचर : अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले असून त्यामुळे आवक घटली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मेथीची एक जुडी तब्बल ५६ रुपयाला तर कोथिंबिरीची जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे.
या मोसमात पालेभाज्यांना मिळालेला हा उच्चांकी भाव आहे. कमी दिवसात येणारे पीक म्हणून मेथी, कोथिंबीरचे उत्पादन शेतकरी घेतो. शिवाय इतर पिकांच्या तुलनेत भांडवली खर्च सुद्धा कमी येतो.
एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. पालेभाज्या त्यावेळी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त प्रयत्न करावे लागतात. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे तेथील शेतकरी प्रामुख्याने पालेभाज्या घेत असतो.
मे महिन्याच्या सुरुवातीला कडक ऊन होते. त्यावेळी अति उष्णतेने पालेभाज्यांची शेतातच मर झाली. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. काहींना त्यात यश आलेही; मात्र अनेक शेतकऱ्यांचे भांडवल सुद्धा वसूल झाले नाही.
त्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या तडाख्यातही हे पीक हातचे गेले आहे. परिणामी मेथी, कोथिंबीर यांचे कमी उत्पादन निघू लागले आहे. शिवाय सततच्या पावसामुळे पिकाची प्रतवारी ढासळली आहे.
भिजलेली मेथी, कोथिंबीर यांना फारशी मागणी नसते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मेथी, कोथिंबीर, पालक, कांदापात या पालेभाज्यांची लिलाव पद्धतीने विक्री होते.
पाच अडते शेतकऱ्यांच्या मालाची विक्री करतात तर १६ व्यापारी पालेभाज्या खरेदी करून मुंबई तसेच इतर शहरात पाठवीत असतात.
शनिवारी कोथिंबिरीच्या तेरा हजार जुड्यांची तर मेथीच्या केवळ ६ हजार ५०० जुड्यांची आवक झाली. आवक घटल्याने बाजारभाव कडाडले आहेत.
शेतकरी दत्तात्रेय आवटे यांच्या मेथीला शेकडा ५ हजार ६०० रुपये भाव मिळाला याचा अर्थ एक जुडी ५६ रुपयाला विकली गेली, तर मारुती रामकृष्ण वाबळे यांच्या कोथिंबिरीला ४ हजार रुपये शेकडा असा भाव मिळाला आहे.
म्हणजेच एक जुडी चाळीस रुपयांना विकली गेली आहे. आराध्य व गुरुकृपा व्हेजिटेबल कंपनीचे प्रशांत सैद यांनी विक्री केली. तर व्यापारी राजू वाबळे यांनी हा शेतीमाल खरेदी केला आहे.
दरम्यान, सततच्या पावसाने भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे आगामी काळात आवक मंदावून बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात यांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा: Soybean Lagwad : यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटणार; लागवड करावी का नको?