रत्नागिरी : नैसर्गिक दुष्टचक्रामुळे आधीच आंबा उत्पादन कमी असताना स्थानिक तसेच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील दरात घसरण झाली आहे.
त्याच वेळी कॅनिंगचेही दर गडगडले असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. कॅनिंग कंपन्यांनी आंबा खरेदीचा दर अचानक ५० टक्के कमी केल्याने ही बागायतदारांची लूट असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
रत्नागिरीतील हापूस आंबा उत्पादक बागायतदार आणि स्थानिक व्यापारी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच, दुसरीकडे कॅनिंगचे दर अचानक घटले आहेत.
सुरुवातीला १०० रुपये प्रतिकिलो असलेला दर नंतर ८०, नंतर ६०, त्यानंतर ५० व त्यावरून आता ३० रुपये इतका कमी झाला आहे.
वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. मात्र, आंबा विक्रीसाठी पाठवताना वाहतूक खर्च, हमालीसाठी पैसे मोजावे लागतात.
निवडक आंबा पेट्या किंवा बॉक्समध्ये भरून पाठविल्यानंतर उर्वरित आंबा कॅनिंगसाठी दिल्यास शेतकऱ्यांना रोख पैसे मिळतात.
हवामानातील प्रतिकूल बदलामुळे जेमतेम १० ते १५ टक्के इतकेच आंबा पीक आहे. त्यातच दर कोसळल्यामुळे खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात पाठवण्यासाठी येणारा खर्च निघत नसल्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत.
कंपन्यांनी घटवलेल्या दराबाबत बागायतदार संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आंब्याचे दर स्थिर न राहिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कॅनिंग कंपन्यांमध्ये सध्या आंबा मातीमोल दराने खरेदी केला जात आहे.
ऐन हंगामात कॅनिंगचे दर अर्ध्यावर आणून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम कंपन्या करत आहेत, असा आरोप व्यावसायिक आणि बागायतदारांनी केला आहे.
बाहेरचा आंबा कायमचा बंद करणार
◼️ फळ प्रक्रिया करणारे कारखाने स्थानिक शेतकऱ्यांचा आंबा डावलून परराज्यातील आंबा खरेदी करत आहेत.
◼️ त्यामुळे बाजारातील आंब्याचे दर कोसळले आहेत. स्थानिक बागायतदारांना त्यांच्या कष्टाचा पैसा मिळणे त्यांचा हक्क आहे.
◼️ त्यामुळे ज्या कंपन्या परराज्यातून आंबा मागवतात, त्यांचा स्थानिक आंबा पुरवठा कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा उद्धवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी दिला आहे. तसेच दर स्थिर न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
अधिक वाचा: वडिलांच्या कोणत्या संपत्तीवर मुलांचा नेमका किती हक्क असतो? वाचा काय सांगतो कायदा?
Web Summary : Ratnagiri mango farmers face crisis as canning companies slash prices by 50%. Low yields and high costs exacerbate losses. Farmers accuse companies of exploitation, prompting protests and threats of action if prices aren't stabilized. Action to stop outside mango.
Web Summary : रत्नागिरी के आम किसान संकट में हैं क्योंकि कैनिंग कंपनियों ने कीमतों में 50% की कटौती की है। कम उपज और उच्च लागत से नुकसान बढ़ रहा है। किसानों ने कंपनियों पर शोषण का आरोप लगाया है, जिससे विरोध प्रदर्शन और कार्रवाई की धमकी दी जा रही है।