Join us

Bedana Market : सांगली, तासगावच्या बेदाणा सौद्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 11:29 IST

व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते.

सांगली : व्यापारी आणि अडत्यांकडील पैसे देण्या-घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तासगाव-सांगली बेदाणा असोसिएशनकडून एक महिन्यासाठी बेदाणा सौदे बंद ठेवले होते.

महिन्यानंतरही काही व्यापारी थकबाकीदार असल्यामुळे त्यांना बेदाणा सौद्यात बंदी घातली आहे. तसेच २५ नोव्हेंबरपासून नियमित बेदाणा सौदे सुरू होणार आहेत, अशीमाहिती असोसिएशनतर्फे दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने व्यापारी येणे देणे म्हणजे शून्य पेमेंट हा उपक्रम राबविण्यात येतो. सांगली, तासगाव, पंढरपूर, विजापूर, सोलापूर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

पण अडत्यांचे, शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे पैसे बुडू नयेत, यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी शून्य पेमेंट ही संकल्पना अमलात आणली. याचा संपूर्ण देशभर व्यापाऱ्यांमध्ये प्रभाव आहे.

चालू वर्षी माल कमी व दर चांगला व निवडणुकीचा काळ असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी झीरो पेमेंट केले नाही. त्यामुळे बेदाणा असोसिएशनकडे सांगली व तासगाव येथील अडत्यांनी मोठ्या प्रमाणात पेमेंट आले नसल्याच्या चिठ्ठया दिल्याचे काही अडत्यांनी सांगितले.

त्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्याकडे कोट्यवधी रुपये अडकल्याने व येणे बाकी असल्याने व निवडणुकीचा काळ धरून बेदाणा असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, या सौद्यामध्ये ज्या व्यापाऱ्यांनी पैसे जमा केले नाहीत, त्यांना सौद्यात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अडत्यांनी पैसे न देणाऱ्यांची नावे द्यावीतअडत्यांनी पैसे न मिळालेल्या व्यापाऱ्यांची नावे दि. २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत देणे गरजेचे आहे. त्याकरिता सांगली येथे पूजा ट्रेडर्स व तासगांव येथे गणेश ट्रेडिंग कंपनी येथे बंद पाकिटामध्ये पैसे न देणाऱ्या व्यापाऱ्यांची नावे द्यावीत, असेही असोसिएशनने अडत्यांना आवाहन केले आहे. मुदतीनंतर नाव दिल्यास त्यास बेदाणा असोसिएशन जबाबदार राहणार नाही, असेही म्हटले आहे.

अधिक वाचा: हरभरा पिकात तुषार सिंचनाने पाणी देण्यामुळे कसे होतात फायदे वाचा सविस्तर

टॅग्स :बाजारमार्केट यार्डसांगलीद्राक्षेशेतकरीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती