Join us

Bedana Market : बेदाणा उत्पादक शेतकरी यंदा होणार मालामाल; दरात झाली दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:18 IST

Bedana Market Solapur सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक मालामाल झाले आहेत.

विठ्ठल खेळगीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत आहे. यंदा गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक मालामाल झाले आहेत.

बेदाण्यातून मागील वर्षांमध्ये जेवढी उलाढाल झाली होती, तेवढी यंदा केवळ तीन महिन्यांतच झाली आहे. दि. २० फेब्रुवारीपासून आतापर्यंत ५० कोटी किमतीच्या बेदाण्याची विक्री झाली आहे. मागील वर्षी ५२ कोटींची उलाढाल झाली होती.

बेदाणा म्हटल्यावर पूर्वी सांगली, तासगाव, पंढरपूर मार्केटची चर्चा होत होती. मात्र, मागील दोन-तीन वर्षापासून सोलापुरातील बेदाणा मार्केट चर्चेत येत आहे.

बेदाण्यासाठी स्वतंत्र मार्केट उभारण्यात आली आहे. स्वतंत्र लिलाव प्रक्रिया दर गुरुवारी होत आहे. मागील वर्षी ८ फेब्रुवारीपासून लिलाव सुरुवात झाली होती. यंदा २० फेब्रुवारीला पहिला लिलाव झाला.

मागील वर्षभरात बेदाण्याच्या दर १५० किलोपेक्षा अधिक गेला नव्हता. यंदा मात्र, पहिल्या लिलावापासूनच ३०० रुपयांपर्यंत दर गेला.

कधी ३५० रुपये, तरी कधी ४२५ रुपये दर मिळाला. दर चांगला मिळत असला तरी आवक घडली आहे. यंदा दर मिळत असल्याने शेतकरी माल सोडत आहेत.

यंदा तीनच महिन्यांत २ लाख ३४ हजार ६३ बॉक्स म्हणजे ३ हजार ५१० टन आवक आहे. त्यातून १ लाख ३६ हजार ३४५ बॉक्स म्हणजे २ हजार ४५ टन बेदाणा विक्रीतून ४९ कोटी ८६ लाख ८० हजार ५५० रुपयांची उलाढाल झाली आहे.

गतवर्षी ७६२६ टन तर यंदा ३५१० टनमागील वर्षभरात ५ लाख ८ हजार ४०१ बॉक्समध्ये ७हजार ६२६ टन आवक होती. त्यातून २ लाख ९३ हजार २७७ बॉक्स म्हणजे ४ हजार ३९९ टन बेदाणा विक्रीतून ५२ कोटी २६ लाख ७९ हजार ७७० रुपयांची उलाढाल झाली आहे.

मागील वर्षी १५० रुपये तर यंदा ४०० रुपयांपर्यंत दरसोलापूर बाजार समितीत मागील वर्षभरात सरासरी दर १५० रुपयांच्या आतच राहिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी काढला नव्हता. दिवाळीनंतर दर वाढण्याची अपेक्षा होती; मात्र डिसेंबरपर्यंत सरासरी दर १०० ते १२० रुपये राहिला. चांगल्या मालाला ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. जानेवारी महिन्यापासून दरात वाढ होत राहिली. यंदा पहिल्या आठवड्यापासूनच ३०० रुपयांचा दर मिळाला. ४२५ रुपये प्रतिकिलो दर गेला होता. सरासरी दर २७० पर्यंत राहिला.

बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे आवक कमी असतानाही उलाढाल वाढली आहे. आता आणखी २५ टक्के माल शिल्लक आहे. त्याचीही विक्री होईल. दिवाळी सणाच्या तोंडावर दरात फरक पडेल, तोपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता आहे. - शिवानंद शिंगडगाव बेदाणा अडत व्यापारी, सोलापूर

अधिक वाचा: अंदमानात मान्सूनचे आगमन; राज्यात या भागात विजांचा कडकडाट व वेगाच्या वाऱ्यासह अवकाळी बरसणार

टॅग्स :द्राक्षेशेतकरीसोलापूरपंढरपूरबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती