पारंपरिक पिकांसोबतच यंदा केळीनेही शेतकऱ्यांची साथ सोडल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी केळीच्या घडाची काढणी सुरू करताच बाजारात भाव गडगडले आहेत. प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांवरून बाराशे ते तेराशे रुपयांखाली दर आल्याने उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वरुड परिसरात केळीचे क्षेत्र मोठे आहे. सिंचनाची सोय असल्यामुळे या भागातील शेतकरी पूर्वीपासूनच केळी लागवड करतात. वरूडसह डोंगरकडा, भाटेगाव, हिवरा झुनझुनवाडी, देववाडी या भागातील शेतकऱ्यांचा केळी लागवडीवर अधिक भर आहे.
जानेवारी ते एप्रिलदरम्यान केळीला बाजारपेठेत दोन हजार रुपयांचा भाव मिळाला. हा भाव कायम राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मे उजाडताच भावात कमालीची घसरण झाली असून, एक हजार २०० ते एक हजार ३०० रुपयांखाली भाव आले आहेत.
सध्याच्या भावाचा विचार केल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे चित्र आहे. येणाऱ्या दिवसांतही दरवाढ झाली नाही तर, केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाववाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे भावात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु, पावसाळा सुरू होताच दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या भाववाढीच्या शाश्वतीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे. परंतु, प्रत्यक्षात भाववाढ होणार की नाही? हे आता सांगणे कठीण आहे.
क्विंटलमागे सातशे रुपयांचा बसतोय फटका
दोन ते तीन महिन्यांत केळीच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. सध्या मिळणाऱ्या भावाचा विचार केल्यास क्विंटलमागे शेतकऱ्यांना जवळपास सहाशे ते सातशे रुपयांचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच घडाची कापणी सुरू केली आहे. पुढील महिन्यात काढणी वाढणार आहे. त्यावेळीही असेच दर राहिले तर शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
वाढत्या तापमानाचा परिणाम
मागील दोन महिन्यांपासून तापमानात कमालीची वाढ झाली असून, पारा ४० ते ४२ अंशावर पोहोचत आहे. अशा परिस्थितीत केळीची पाने करपून जात असून, केळीवर काळे डाग पडत आहेत. यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या