प्रफुल्ल लुंगे
संपूर्ण महाराष्ट्र व मध्य प्रदेशात वर्धा जिल्ह्याच्या सेलू येथील केळीला मनमोहक रंग, रूप व दर्जामुळे चांगली मागणी होती. मात्र, उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी या तोट्याच्या गणितामुळे सेलू तालुक्यातील केळीच्या बागा बोटावर मोजण्या इतक्या शिल्लक राहिल्या होत्या.
सेलू तालुक्याचे केळीच्या बागांचे वैभव इतिहासजमा होण्याची वेळ आली होती. मात्र, शासनाने एमआरजीएस व इतर योजनांतून केळीच्या पिकाला मोठे अनुदान जाहीर केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात गावागावांत नव्याने केळीच्या बागा बहरलेल्या दिसत आहे; पण आता पुन्हा भावबाजीने दगाफटका दिल्याने बागायतदारांना जबर फटका बसला आहे.
तालुक्यात बागा वाढायला लागल्याने बागायतदार शेतकऱ्यांच्या गावाच्या वैभवातही भर पडली. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक २ हजार २५० रुपये क्विंटल इतका भाव मिळाला गेल्या जून २०२५ ला १ हजार ६५० एवढा भाव हाती पडला. मात्र, सप्टेंबर महिन्यात भाव फक्त ६५० रुपये क्विंटल एवढे खाली आले.
गणपती-गौरीच्या काळात केळीला मोठी मागणी असताना ही अवस्था शेतकऱ्यांच्या नशिबी आली. एकाएकी केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात काटणीवर आल्याने दर खाली आपटले. एकाएकी कमी झालेल्या दरामुळे केळी उत्पादकांचे आर्थिक गणित विस्कटून गेले आहे.
सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागा कटाईवर आल्या असून, भाव एकदम कमी आल्याने केळीच्या व्यापाऱ्यांकडून कटाई करण्यासाठी उदासीनता दाखविली जात आहे. आंब्याच्या हंगामात भाव पडण्याची शक्यता असतानाही केळीच्या दराचा तोरा कायम होता.
आता ऐन सणासुदीच्या दिवसांत भाव वाढण्याची अपेक्षा असताना भाव अपेक्षेपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक चिंतेत सापडले असून नवीन बागायतदार मोठ्या प्रमाणात वाढण्याची चर्चा होत होती. त्यांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
केळी पिकविणारे सेलूमधील रायपनिंग सेंटरचालकही चक्रावले..
• बदलत्या आधुनिक युगात केळी पिकविण्याची पद्धतही बदलली. केळी पिकविण्यासाठी रायपनिंग सेंटर सुरू झाले. एकट्या सेलू शहरात पाचपेक्षा जास्त रायपनिंग सेंटर आहेत. मोठमोठ्या खोल्यांमध्ये उच्चदाबाचे एसी फिटिंग करून केळीच्या घडापासून वेगवेगळ्या केलेल्या फण्या कॅरेटमध्ये टाकून ते एकावर एक एसी बंद खोलीत रचून ठेवले जाते. त्या बंद खोलीत गॅस सोडला जातो. तीन-चार दिवसांत या प्रक्रियेत विक्रीसाठी माल तयार होतो.
• वाहनातून तो मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी जातो. यापूर्वी स्थानिक केळी उत्पादक शेतकरी कमी असल्याने व्यापारी केळी उत्पादक जिल्ह्यातून केळी खरेदी करून आणून रायपनिंग सेंटर चालवीत होते. त्यात वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढत होता.
• आता स्थानिक बागायतदारांचाच माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. मात्र, भाव पडल्याने व माल जास्त उपलब्ध झाल्याने रायपनिंग सेंटर चालविणारे व्यापारी केळीच्या बागांची कटाई करण्यासाठी उत्साही दिसत नाहीत.
असे घसरत गेले केळीचे दर
महिना | दर (प्रतिक्विंटल) |
जून | १६५० |
जुलै | १२७५ |
ऑगस्ट | ८७५ |
सप्टेंबर | ६५० |