Join us

Bajari Bajar Bhav : थंडी वाढल्याने बाजरीची मागणी वाढली; बारामती बाजार समितीत क्विंटलला मिळतोय असा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:16 IST

वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे.

बारामती : वाढत्या थंडीत आरोग्याला बाजरीची भाकरी पोषक मानली जाते. त्यामुळे सध्या बाजरीची मागणी वाढली आहे. परिणामी तुलनेने चांगल्या दर्जाची बाजरी बाजारात गव्हापेक्षा अधिक महाग असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आहारात चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग झाली आहे.

सध्या चांगल्या गव्हाचे दर २९०० रुपयांपासून ३४०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर, चांगल्या प्रतीच्या बाजरीची किंमत ३३०० रुपये प्रतिक्विंटलपासून सुरू होत आहे. बारामतीत सातारा जिल्ह्यातून घाटावरच्या ज्वारीची आवक होते.

यामध्ये बाजरीचे अनेक प्रकार आहेत. मात्र, ८२०३ बाजरीला अधिक मागणी आहे. गेल्या दहा महिन्यात बाजरीने प्रतिक्विंटल ३४०० रुपयांपर्यंत उच्चांक पोहोचला आहे.

तसेच गव्हामध्ये लोकवन तसेच २१८९ गहू खाण्यासाठी वापरला जातो. थंडीत नेहमीच खाण्यासाठी बाजरीची मागणी वाढते. यंदाचा हिवाळादेखील त्याला अपवाद नाही.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले की, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रतिवर्ष ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक बाजरीची आवक होते. इंदापूर, फलटण, पुरंदर भागातून बाजरीची आवक होते, असे जगताप यांनी सांगितले.

बारामती येथील भुसार मालाचे व्यापारी बाळासाहेब फराटे यांनी सांगितले की, पावसात भिजलेली बाजरी २२०० ते २६०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल मिळत आहे.

तर, पावसापूर्वी न भिजलेली काढलेली बाजरी ३२५० रुपये प्रतिक्विंटल दराने उपलब्ध आहे. आपल्याकडे फलटण भागातून घाटावरील ज्वारीची आवक होते.

अधिक वाचा: Tur Bajar Bhav : सोलापुर बाजार समितीत लाल तुरीला मिळाला सर्वाधिक भाव कसा मिळतोय दर वाचा सविस्तर

टॅग्स :बाजरीबाजारमार्केट यार्डबारामतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी