सय्यद लाल
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यानंतर आता तुरीच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असताना आणि ८ हजार रुपये हमीभाव जाहीर झाला असतानाही, प्रत्यक्षात ६ हजार ६०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची लूट सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०२५-२६ खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र सुमारे ३९ हजार ५२० हेक्टर आहे. तर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात तुरीचे सरासरी क्षेत्र २ हजार ५०० ते ३ हजार ५०० हेक्टरदरम्यान असते. यावर्षी उन्हाळी मका काढणीनंतर अनेक शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केल्याने यंदा उत्पादनात वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत बाजार सावंगी व परिसरातील शेत शिवारात तूर पिकाची सोंगणी व काढणी सुरू झाली असून, चालू वर्षी तूर पीक समाधानकारक झाले आहे.
२०२५-२६ साठी तुरीचा हमीभाव ८ हजार रुपये प्रतिक्विंटल (मूळ हमीभाव ७ हजार ५५० केंद्र सरकारचा प्रोत्साहन बोनस ४५०) असा निश्चित करण्यात आला आहे. सध्या तूर सोंगण सुरू असून काही भागांत तूर काढणी सुरू होताच बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी तुरीला हमीभावानुसार ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता.
सध्या हा दर घसरून ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आला आहे. किमान हमीभावाच्या आसपास तुरीची खरेदी होणे आवश्यक असताना याबाबतचा कायदा नसल्याने शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे. खत, बियाणे, मजुरी तसेच वाहतूक खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
१०० टक्के तूर खरेदीचे धोरण कागदावरच !
• 'सहकार पणन महासंघ' व 'नाफेड' मार्फत जिल्ह्यात एकूण ११ मुख्य खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जातात. यात खुलताबाद येथे तालुका खरेदी-विक्री संघात हमीभाव केंद्र असते.
• जिल्ह्यात संभाजीनगर शहर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना व विहामांडवा येथे हमीभाव केंद्र सुरू असतात.
• सरकारने यंदा तुरीच्या एकूण उत्पादनाच्या १०० टक्के खरेदी करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्यात एकही तूर खरेदीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
Web Summary : Tuar farmers in Chhatrapati Sambhajinagar face losses as prices fall below the MSP of ₹8000, reaching ₹6600. Despite high yields, government purchase centers remain inactive, leaving farmers vulnerable to exploitation and increased costs.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में तुअर किसानों को नुकसान, कीमतें ₹8000 के MSP से गिरकर ₹6600 तक पहुंचीं। उच्च उपज के बावजूद, सरकारी खरीद केंद्र निष्क्रिय हैं, जिससे किसान शोषण और बढ़ी हुई लागतों के प्रति संवेदनशील हैं।