पनवेल : जिल्ह्यात पांढरा कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. कांदा उत्पादक काढणीच्या कामाला लागल्याने अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे.
येत्या काही दिवसात कांद्याचा माळा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला पुणे, मुंबई, रत्नागिरी, नवी मुंबई येथून मागणी असल्याचे कांदा उत्पादकांकडून सांगण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगाव परिसरातील गावांमध्ये कांद्याची लागवड केली आहे.
रोजगाराचे दालन खुले कांदा काढणीपासून माळा तयार करण्यासाठी महिला वर्गाला काम मिळू लागले आहे. साडेतीनशे रुपये प्रमाणे दिवसाची मजुरी महिलांना मिळत आहे. कार्लेसह आजूबाजूच्या गावातील महिला हे काम करीत आहेत. मार्चपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने तीन महिने महिलांना रोजगाराचे दालन खुले झाले आहे.
दर वाढण्याची शक्यता १) मजुरीचे वाढते दर, कांदा लागवडीपासून बाजारात पाठविण्यासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पांढऱ्या कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.२) पहिल्या टप्प्यातील कांद्याची माळ तीनशे रुपये दराने विकली जाणार आहे. त्यामुळे यंदा चार माळी मागे एक हजार २०० रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत, असे कांदा उत्पादकांनी सांगितले. ३) कांदा लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळत आहे. अलिबागमधील पांढरा कांदा चविष्ट व आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे या कांद्याला प्रचंड मागणी आहे.४) कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने बाजारात अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याची किंमतही यंदा वाढणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा: Unhali Bhuimug : उन्हाळी भुईमुगाची लागवड करताय? कोणत्या जाती निवडाल?