Join us
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी फळांचा बाजारात धुमाकूळ; हिरवीगार कैरी खातेय भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:18 IST

नवनवीन आंब्यांच्या प्रजातीमध्ये गावठी आंबा दिसेनासा

सध्या राज्याच्या अनेक लहान मोठ्या बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्यांसह हंगामी फळे मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. बाजारपेठेत मोठी कैरी १२० रुपये किलो, तर लहान कैरी ८० रुपये दराने विकण्यात येत आहे.

काही दिवसांपासून खिरण्या, येरोण्या, कवठ, इंग्रजी चिंचा, चारा आदी रानमेवासुद्धा बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांना काही प्रमाणात का होईना, रोजगार मिळताना दिसत आहे.

भंडारा जिल्ह्यात शेती हेच ग्रामीणांच्या उपजीविकेचे साधन आहे. उन्हाळ्यात शेतीची कामेही नसतात. दुसरे उद्योगधंदे नसल्याने स्थानिकांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे वनोपजावर आपली उपजीविका भागवावी लागते.

तसेच सध्या उन्हाळ्यात आंबा, येरोण्या, चारा खिरण्या बोलींटे कचरकांटे विक्री करून दिवस ढकलावे लागत आहेत. मात्र, हवामानाचा या पिकांवर मोठा परिणाम होत आहे. कोका अभयारण्य झाल्याने जंगलात जाण्यास बंदी असल्याने त्यावरही बरेच निर्बंध आले आहेत.

तरीसुद्धा पोटासाठी जीव धोक्यात घालून ग्रामीण कुटुंबे हा रानमेवा गोळा करतात. अलिकडे गावठी आंबा दुर्मीळ झाला आहे. मात्र गावठी आंब्याची चव अनोखी असल्याने आजही त्यास प्रचंड मागणी आहे. सध्या कलिंगड, खरबूज, आंबे, द्राक्ष अशा हंगामी फळांची विक्री केली जात आहे.

हे ही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने

टॅग्स :फळेभाज्याशेतीशेतकरीबाजार