सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर येथे बुधवारी कांद्याची प्रचंड आवक झाल्याचे पाहायला मिळाले. आजच्या दिवसात बाजार समितीत एकूण ३५८ ट्रक कांद्याची आवक झाली आहे.
बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कांद्याचे किमान दर १०० रुपये, कमाल दर १६०० रुपये तर सर्वसाधारण दर ७०० रुपये मिळाले.
दरम्यान, बुधवारी बाजार समितीत एकूण ७१ हजार ७९४ पिशव्यांची आवक झाली. बुधवारी २ कोटी ५१ लाख २४ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली.
बुधवारी समितीच्या आवारात कांद्याच्या ७१ बाजार हजारांहून अधिक पिशव्यांची आवक झाल्याने व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
कमाल दर १६०० रुपयांपर्यंत गेल्याने दर्जेदार कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र सर्वसाधारण दर ७०० रुपयांवर स्थिरावला आहे.
मागील आठवड्यात कांद्याची आवक चांगलीच खालावली होती; मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढली आहे. सोमवारी २७१, मंगळवारी ३२७ कांदा गाड्यांची आवक झाली.
आवक वाढल्यामुळे आणि मागणीतील बदलांमुळे कांद्याचे दर दबावात आहेत. चांगल्या मालाला १२-१३ रुपये किलो तर लहान कांद्यासाठी ४-८ रुपये किलो दर मिळत आहे.
खर्च जादा... उत्पन्न कमीच
◼️ उत्पादन खर्च वाढला असून, बाजारातील कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
◼️ अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असतानाही, अचानक वाढलेल्या आवकेने दर कमी झाल्याचे सांगण्यात आले.
◼️ एकीकडे उत्पादन खर्च वाढला असताना शेतकऱ्यांच्या पदरात कमी उत्पन्न पडत आहे.
अधिक वाचा: हवामानात मोठा बदल; राज्यात 'या' ठिकाणी ९ ते ११ मे दरम्यान पुन्हा गारपिटीसह पावसाची शक्यता
