जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जि. जळगाव) बाजार समितीत असणाऱ्या कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात येथील कांदाबांगलादेशासह पंजाब, जम्मू-काश्मीर व हैदराबाद येथेही निर्यात झाला आहे.
त्यामुळे गिरणा पट्ट्यातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कांदा हा नेहमीच आपल्या दरामुळे वांधा करीत असतो. मात्र गत पंधरा दिवसांपासून लाल कांद्याला भावही चांगला मिळत आहे.
उन्हाळी भगव्या कांद्यापेक्षा लाल कांदा कमी टिकतो. त्यामुळे मिळेल त्या भावात तो विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या काही दिवसांत परदेशांत कांद्याची आयात होऊ लागल्याने ठोक बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत कांद्याची आवक काहीशी मंदावली आहे. त्यामुळे भावाचा आलेखही खाली आहे. चाळीसगाव बाजार समितीतून यापूर्वी श्रीलंकेतही कांद्याची निर्यात झाली आहे.
घाऊक बाजारातून कांद्याची मागणी वाढल्याने दरामध्ये तेजी आली. बांगलादेशात तणावाची परिस्थिती असल्याने अन्नधान्य व इतर पदार्थांची आयात होत आहे. त्यातच कांद्याचीही मागणी होऊ लागल्याने गेल्या १५ दिवसांपासून कांद्याचे प्रतिक्विंटल भावही वधारले आहेत.
मध्यंतरी कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी राज्यभर रास्ता रोको आंदोलनेही केली होती. मात्र सद्यःस्थितीत ही परिस्थिती बदलली असून कांद्याची निर्यात होत आहे.
दोन-तीन दिवसांपासून आवक ओसरली
• ८ ते २४ या कालावधीत गत १६ दिवसांत चाळीसगाव बाजार समितीत लाल कांद्याची मोठी आवक झाली. एकूण २२ हजार क्विंटल कांद्याची खरेदी केली गेली. मागणी वाढली असली तरी, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आवक काहीशी ओसरली आहे.
• आवक ओसरल्याने दर आणखीन काही प्रमाणात वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. उन्हाळी कांदा बाजारात येण्यास अजून बराच काळ असल्याने या कांद्याच्या दरात असेच चढउतार होत राहणार आहेत.
कांदा परदेशासह परराज्यात..
• गेल्या १६ दिवसात बाजारात आलेला सर्व कांदा परदेशासह देशातील इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी पाठविला.
• कांद्याला २४०० रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. असे असले तरी हंगामाचे गणित मांडताना गेल्या चार ते पाच कांदा लागवडीचा खर्च वाढला असून अतिवृष्टीसह दुष्काळाचाही फटका या पिकाला बसला आहे.
• चाळीसगाव तालुक्यात परतीच्या पावसाने कांदा लागवडीचे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्नला काहीअंशी कात्री लागली आहे.
चाळीसगाव परिसरात गेल्या काही वर्षात कांदा लागवड वाढली आहे. त्यामुळे मार्केट मध्ये आवक होत असते. गत आठवड्यात व्यापाऱ्यांनी बाजार समितीतून खरेदी केलेला कांदा बांगलादेशात गेला आहे. गेल्या आठवड्यात भावही चांगले मिळाले. सद्यस्थितीत आवक कमी झाली आहे. - प्रदीप पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाळीसगाव.
गत आठवड्यात मिळाला कांद्याला चांगला भाव
• गेल्या बारा दिवसांत गत आठवड्यात कांद्याला २४०० रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. कांदा मार्केटमध्ये दरदिवशी दोन ते अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे.
• गत दोन दिवसांपासून भाव खाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत प्रतिक्विंटल सरासरी ७०० रुपयांचा फटका बसला आहे.
• शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा अवघे चार ते पाचच दिवस टिकला. मंगळवारी १८७७ रुपये प्रतिक्विंटलने लिलाव झाले. बुधवारी हे भाव १७७ रुपयांनी कमी होऊन प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी लिलाव पुकारण्यात आले.
बांग्लादेशात तणाव; कांद्यालाही वाढली मागणी..
१५ दिवस झाले कांद्याचे भाव प्रतिक्विंटलमागे वधारले आहेत. त्यामुळे चाळीसगावच्या कांद्याची बांग्लादेश वारी सफल झाली आहे. शेतकऱ्यांनाही त्यामुळे दिलासा मिळाला.